डिलिव्हरीबॉयच्या गणवेशात प्रेयसीवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न; प्रियकराचा जामीन फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 10:30 IST2025-12-12T10:27:35+5:302025-12-12T10:30:23+5:30
डिलिव्हरीबॉयच्या गणवेशात आलेल्या या तरुणाचे पिस्तूल लॉक झाल्याने तरुणी बचावली.

डिलिव्हरीबॉयच्या गणवेशात प्रेयसीवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न; प्रियकराचा जामीन फेटाळला
पुणे : बाणेरमध्ये प्रेमाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीवर पिस्तुलातून गोळीबाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी प्रियकराचा जामीन अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळला. डिलिव्हरीबॉयच्या गणवेशात आलेल्या या तरुणाचे पिस्तूल लॉक झाल्याने तरुणी बचावली. 'मात्र गुन्ह्याचे गंभीर स्वरूप आणि पुरावे लक्षात घेता; तसेच तक्रारदार तरुणीच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता पाहता, आरोपीला नियमित जामीन देता येणार नाही,' असा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांनी दिला.
गौरव महेश नायडू (वय २५, रा. पिंपरी-चिंचवड) असे जामीन फेटाळलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात २४ वर्षीय पीडितेने बाणेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. ही घटना २९ ऑगस्ट रोजी सकाळी पावणेदहाच्या सुमारास बाणेर येथील एका खासगी प्रशिक्षण संस्थेच्या आवारात घडली होती.
या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या गौरवने जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला. त्याला सरकारी वकील जावेद खान आणि तक्रारदार तरुणीचे वकील ॲड. खंडेराव टाचले यांनी विरोध दर्शविला. आरोपीने नियोजनबद्ध पद्धतीने तरुणीवर जीवघेणा हल्ला केला असून, त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे. त्याला जामीन मंजूर झाल्यास तो तरुणीवर पुन्हा हल्ला करून साक्षीपुराव्यात छेडछाड करू शकतो, असा युक्तिवाद सरकारी वकील आणि तक्रारदार तरुणीच्या वकिलांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीचा जामीन फेटाळला.