कोल्ड कॉफीतून गुंगीचे औषध देऊन मैत्रिणीच्या घरातून ५ लाखांचे दागिने केले लंपास
By नितीश गोवंडे | Updated: April 4, 2025 21:27 IST2025-04-04T21:24:25+5:302025-04-04T21:27:32+5:30
तिने कॉफीत गुंगीचे औषध मिसळले होते. कॉफी पिल्यानंतर तरुणी बेशुद्ध पडली

कोल्ड कॉफीतून गुंगीचे औषध देऊन मैत्रिणीच्या घरातून ५ लाखांचे दागिने केले लंपास
पुणे : कोल्ड कॉफीतून एका मैत्रिणीने दुसऱ्या मैत्रिणीला गुंगीचे औषध दिले. त्यानंतर संधी मिळताच तिने घरात असलेल्या कपाटातील ५ लाख ४६ हजार रुपये किमतीचे दागिने चोरले. हा प्रकार ६ मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास सिंहगड रोड आंबेगाव बुद्रुक येथील निर्माण विवा सोसायटीत घडला आहे.
याप्रकरणी ३१ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार आंबेगाव पठार येथील २५ वर्षीय तरुणीवर गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. अधिक माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी तरुणी दोघी एकमेकींच्या मैत्रिणी आहेत. दोघी विवाहित असून, विवाहापूर्वी त्या सदाशिव पेठेत एका खोलीत राहत होत्या. फिर्यादी एका अभ्यासक्रमाला प्रशिक्षणार्थी तर आरोपी तरुणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. लग्नानंतर एक आंबेगाव बुद्रुक, तर दुसरी आंबेगाव पठार परिसरात वास्तव्यास आहे. दोघींची पूर्वीची मैत्री असल्यामुळे एकमेकींच्या घरी येणे-जाणे सुरू होते.
आरोपी तरुणीला शेअर मार्केट आणि ऑनलाइन गेमिंगचा नाद आहे. ६ मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास आरोपी तरुणी फिर्यादीच्या घरी कोल्ड कॉफी घेऊन आली. तिने कॉफीत गुंगीचे औषध मिसळले होते. कॉफी पिल्यानंतर फिर्यादी तरुणी बेशुद्ध पडली. त्यानंतर आरोपी तरुणीने फिर्यादीच्या कपाटात ठेवलेले ५ लाख ४६ हजार रुपये किमतीच्या दागिन्यांची चोरी केली. फिर्यादी महिलेला काही दिवसांनंतर घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. तिने आरोपी तरुणीला याबाबत विचारणा केली असता तिने दागिने चोरल्याची कबुली दिली. तसेच, ते दागिने परत करते असे सांगितले. त्यानंतरही आरोपीने दागिने परत न केल्याने फिर्यादी महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित आरोपी तरुणीला अटक केली. नीलेश मोकाशी तपास करत आहेत.