शिवणे स्मशानभूमीत काळ्या जादूच्या घटनांचा वाढता कहर; स्थानिक रहिवाशांची कारवाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 17:55 IST2025-03-19T17:54:18+5:302025-03-19T17:55:25+5:30
या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शिवणे स्मशानभूमीत काळ्या जादूच्या घटनांचा वाढता कहर; स्थानिक रहिवाशांची कारवाईची मागणी
शिवणे : शिवणे स्मशानभूमीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून संशयास्पद घटनांची नोंद होत आहे. स्थानिक रहिवाशांच्या मते, स्मशानभूमीत लिंबू, बाहुल्या, नारळ, आणि फोटोला सुई टोचलेले तंत्र-मंत्राचे साहित्य आढळून येत आहे. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या परिसरात काळ्या जादू किंवा जादूटोण्याशी संबंधित विधी येथे सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे येथील नागरिक अस्वस्थ झाले असून, पोलिस आणि महापालिकेकडे योग्य चौकशी करून उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात पोलिस प्रशासन व स्थानिक प्राधिकरण काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नागरिकांनीही अशा घटना आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिवणे, उत्तमनगर, कोपरे, कोंढवे धावडे या चारही गावातील स्मशानभूमी परिसरात सुरक्षा रक्षक नेमण्यात यावे तसेच येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे, अशी मागणी केली होती. अशा घटना रोखणे अत्यंत आवश्यक बाब आहे. प्रशासनाने त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे. - अतुल दांगट,सामाजिक कार्यकर्ता, शिवणे
आम्ही या घटनांची गांभीर्याने दखल घेतली आहे. परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनीही सतर्क राहून अशा कोणत्याही संशयास्पद गोष्टी आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे. असे करताना कोणी आढळल्यास काळ्या जादूविरुद्ध कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल.
- मोहन खंदारे,वरिष्ठ पोलिस निरीक्षक, उत्तमनगर