Pune Crime: पत्नी अन् तिच्या बॉयफ्रेंडच्या त्रासामुळे पतीने उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 19:11 IST2025-07-10T19:10:46+5:302025-07-10T19:11:42+5:30
Pune Crime News: अतुल आणि सोनाली यांचा २०१५ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले.

Pune Crime: पत्नी अन् तिच्या बॉयफ्रेंडच्या त्रासामुळे पतीने उचलले टोकाचे पाऊल
पुणे : पत्नी आणि तिच्या मित्राने दिलेल्या त्रासामुळे तरुणाने आत्महत्या केल्याची घटना नाना पेठेत घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पत्नीसह तिच्या मित्राविरोधात समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
अतुल मारुती कदम (३९, रा. बालाजी काॅम्प्लेक्स, पिंपरी चौक, नाना पेठ) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. अतुल यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पत्नी सोनाली अतुल कदम (३१, रा. साडेसतरानळी, हडपसर) तसेच तिचा मित्र कृष्णा शिंदे (रा. हडपसर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अतुल यांची आई माधुरी मारुती कदम (६१) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल आणि सोनाली यांचा २०१५ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. दरम्यान, अतुलला पत्नी साेनाली हिचे कृष्णा शिंदे याच्याशी मैत्री संबंध असल्याची माहिती मिळाली. या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. वादामुळे सोनाली वेगळी राहायला लागली. ती माहेरी निघून गेली. त्यानंतर सोनाली आणि तिचा मित्र कृष्णा यांनी अतुलला त्रास देण्यास सुरुवात केली. त्याच्या मोबाइलवर संपर्क साधून धमकाविण्यात आले.
पत्नी आणि तिच्या मित्राच्या त्रासामुळे अतुल यांनी गेल्या महिन्यात १५ जून रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी आणि तिच्या मित्राने दिलेल्या त्रासामुळे मुलगा अतुलने आत्महत्या केल्याचे आई माधुरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक शेंडगे पुढील तपास करत आहेत.