५६ तोळे सोन्याचे दागिने जप्त; खानापूरमधील सराफा दुकानावर दिवसाढवळ्या दरोडा टाकणारी टोळी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 19:29 IST2025-12-30T19:29:37+5:302025-12-30T19:29:51+5:30
५६ तोळे सोन्याचे दागिने जप्त; ७०.३२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

५६ तोळे सोन्याचे दागिने जप्त; खानापूरमधील सराफा दुकानावर दिवसाढवळ्या दरोडा टाकणारी टोळी जेरबंद
पुणे : खानापूर (ता. हवेली) येथील वैष्णवी ज्वेलर्स या सराफा दुकानावर दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत जेरबंद करत मोठे यश मिळवले आहे. या कारवाईत सुमारे ५६ तोळे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (किंमत सुमारे ७० लाख ३२ हजार रुपये) हस्तगत करण्यात आले आहेत.
२६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पाच अज्ञात दरोडेखोरांनी तलवार व कोयत्यासारखी हत्यारे घेऊन वैष्णवी ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा टाकला होता. दुकानमालक व महिला कर्मचाऱ्यांना हत्याराचा धाक दाखवून सुमारे ८४ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून अंदाजे १ कोटी ५ लाख रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला होता. या प्रकरणी दुकानमालकाच्या पत्नी राणी अमोल बाबर (वय २८) यांनी हवेली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल व अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला गती दिली. स्थानिक गुन्हे शाखा, हवेली व वेल्हे पोलिस ठाण्याची मिळून सहा तपास पथके तयार करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज व साक्षीदारांच्या माहितीनुसार दरोडेखोर पानशेत मार्गे वेल्हे तालुक्याकडे पळाल्याचे निष्पन्न झाले. सलग दोन दिवस रात्रंदिवस तपास करून पोलिसांनी वेल्हे तालुक्यातील सिंगापूर डोंगर परिसरातील जंगलातून अंकुश दगडू कचरे (वय २०, रा. साईनगर कात्रज, मूळ रा. सिंगापूर मोहरील, ता. वेल्हे) व गणेश भांबू कचरे (वय २३, रा. वाघजाईनगर कात्रज, मूळ रा. हारपुड, ता. वेल्हे) यांना अटक करण्यात आली असून, त्यांनी तीन विधिसंघर्षित बालकांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
मुख्य आरोपीवर तीन गुन्हे
आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला कोयता तसेच ५६ तोळे २ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता ५ जानेवारी २०२६ पर्यंत पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. मुख्य आरोपी अंकुश कचरे याच्यावर यापूर्वीही तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.
या पथकाने केली कामगिरी
ही यशस्वी कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, हवेली पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक वैशाली पाटील, वेल्हे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर शेवते, महादेव शेलार, दत्ताजीराव मोहिते, हनुमंत पासलकर, शीतल टेंबे, संजय सुतनासे, सुभाष गिरे, दिलीपराव शिंदे, रामदास बाबर, अमोल शेडगे, मंगेश थिगळे, मंगेश भगत, तुषार भोईटे, सागर नामदास, गणेश धनवे, संतोष तोडकर, संतोष भापकर, युवराज सोमवंशी, राजू मोमीन, योगेश नागरगोजे, राहुल पवार, दीपक साबळे, संदीप वारे, भारत मोहोळ, अतुल डेरे, अक्षय नवले, नीलम निकम, स्नेहल कामठे आदींनी केली.