१०४ कामगारांच्या नावे बनावट पीएफ खाती उघडून फसवणूक
By नितीश गोवंडे | Updated: April 2, 2025 18:54 IST2025-04-02T18:54:17+5:302025-04-02T18:54:32+5:30
- कंपनीच अस्तित्वात नसल्याचा भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला पत्ताच नाही

१०४ कामगारांच्या नावे बनावट पीएफ खाती उघडून फसवणूक
पुणे : कंपनीच अस्तित्वात नसताना १०४ कामगारांच्या नावे बनावट भविष्य निर्वाह खाते (पीएफ) उघडून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. बनावट खाते उघडल्याचा प्रकार भविष्य निर्वाह निधी कार्यालयालाच माहिती नव्हता. काही कामगारांना खाते बंद करुन पैसे काढण्यासाठी धमकावण्याचा मेसेज सोशल मीडियाद्वारे पाठवण्यात आला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी श्री गणेश एंटरप्राइजेसचा मालक सीताराम ठकाणसिंग याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील अधिकारी जयकिसन मोहनदास मनवानी (वय ४९, रा. महेश सोसायटी, बिबवेवाडी) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीताराम ठकाणसिंग (रा. साठे वस्ती, सणसवाडी) याने भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या संकेतस्थळावर श्री गणेश एंटरप्राइजेस या फर्मची नोंदणी केली होती. २३ डिसेंबर २०२० रोजी त्याने याबाबत अर्ज केला होता. त्यानंतर त्याला कार्यालयाकडून सांकेतिक क्रमांक देण्यात आला. या कंपनीत १०४ कामगारांच्या नावे ऑनलाइन पद्धतीने ‘पीएफ’ खाते उघडण्यात आले.
त्यानंतर श्री गणेश एंटरप्राइजेस नाव असलेल्या वेगवेगळ्या कंपनीतील ११ कर्मचाऱ्यांनी ई-मेलद्वारे जून २०२४ मध्ये भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे तक्रार दिली. संबंधित कंपनीत काम केले नसल्याचे त्यांनी कळवले होते. त्यांच्या संमतीशिवाय बनावट ‘पीएफ’ खाते उघडण्यात आल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. संबंधित खाते रद्द करण्यासाठी अज्ञाताने सोशल मीडियाद्वारे मेसेज पाठवला असून, तो पैसे मागत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. याबाबत चार कर्मचाऱ्यांनी ते वास्तव्यास असलेल्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या होत्या. त्यानंतर भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील क्षेत्रीय आयुक्त यांनी श्री गणेश एंटरप्राइजेस या फर्मच्या मालकांची पडताळणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार फिर्यादी मनवानी, त्यांचे सहकारी डी. एस. तिलवणकर, अधिकारी अमोद देशपांडे हे ३१ जुलै २०२४ रोजी नगर रस्त्यावरील सणसवाडीत असलेल्या साठे वस्तीतील श्री गणेश एंटरप्राइजेस या कंपनीच्या कार्यालयाची पाहणी करण्यासाठी गेले. तेव्हा या भागात अशा प्रकारची कंपनीच अस्तित्वात नसल्याचे आढळून आले. कंपनीचे मालक सीताराम ठकाणसिंग याचा ठावठिकाणा लागला नाही. बनावट कंपनीच्या नावे ठकाणसिंग याने कामगारांच्या नावे बनावट ‘पीएफ’ खाते उघडल्याचे उघडकीस आले. त्यानंतर १ ऑगस्ट २०२४ राेजी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील आयुक्तांना अहवाल सादर करण्यात आला. आठ महिन्यांनी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. या प्रकरणी श्री गणेश एंटरप्राइजेसचा मालक सीताराम ठकाणसिंग याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक धीरज कांबळे पुढील तपास करत आहेत.
बनावट ‘पीएफ’ खात्याविषयी अनेक प्रश्न उपस्थित?
ठकाणसिंग याने बनावट ‘पीएफ’ खाते उघडले तसेच बनावट दुकान परवाना काढल्याचे उघडकीस आले आहे. १०४ कामगारांच्या नावाने बनावट ‘पीएफ’ खाते काढण्यात आले. या खात्यात कंपनी मालक दरमहा भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरत नव्हता, ही बाब भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील अधिकाऱ्यांना लक्षात कशी आली नाही, कंपनी अस्तिवात नसताना दुकान परवाना कसा मिळवला तसेच बनावट खाते काढण्याचा नेमका उद्देश काय होता, यादृष्टीने पोलिसांना तपास करावा लागणार आहे.