Pune Crime : सराईत गुन्हेगारांकडून चार गावठी पिस्तुलांसह काडतुसे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 15:07 IST2026-02-07T15:07:21+5:302026-02-07T15:07:30+5:30
त्या वादाचा वचपा काढण्यासाठी तसेच शस्त्र विक्रीच्या उद्देशाने त्याने हा शस्त्रसाठा बाळगला होता.

Pune Crime : सराईत गुन्हेगारांकडून चार गावठी पिस्तुलांसह काडतुसे जप्त
पुणे : शहरात शस्त्रसाठा करून दहशत पसरवण्याच्या तयारीत असलेल्या दोघा सराईत गुन्हेगारांना खंडणी विरोधी पथकाने अटक करून त्यांच्याकडून चार गावठी पिस्तूल व पाच जिवंत काडतुसे जप्त केली. ही कारवाई शिवाजीनगर परिसरात करण्यात आली असून जप्त शस्त्रांची एकूण किंमत १ लाख ६४ हजार ३०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
रोहित दुर्गेश धर्माधिकारी (२४, रा. प्रियदर्शननगर, जुनी सांगवी) आणि अभिषेक राजू टेंकल (२३, रा. विष्णू कृपानगर, जुने शिवाजीनगर बसस्थानकाजवळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रोहित धर्माधिकारी हा बेकायदा गावठी पिस्तुलांची विक्री करण्यात सक्रिय असून त्याच्यावर सांगवीसह विविध पोलिस ठाण्यांत आर्म ॲक्ट अंतर्गत पाच गुन्हे दाखल आहेत. तसेच भोसरी पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हाही नोंद आहे. अभिषेक टेंकल याच्यावर सांगवी पोलिस ठाण्यात आर्म ॲक्ट तसेच सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करून कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल आहे.
रोहित धर्माधिकारी याचे सांगवी परिसरात एका व्यक्तीशी भांडण झाले होते. त्या वादाचा वचपा काढण्यासाठी तसेच शस्त्र विक्रीच्या उद्देशाने त्याने हा शस्त्रसाठा बाळगला होता. खंडणी विरोधी पथकातील पोलिस अंमलदार सुरेंद्र जगदाळे व प्रशांत शिंदे यांना सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ज्ञानेश्वर पादुका चौकात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.