प्लॉट धारकांचा रस्ता अडवून खेडच्या माजी उपसभापतीने केली खंडणीची मागणी; पोलिसांनी केला गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 10:09 IST2025-03-15T10:08:46+5:302025-03-15T10:09:46+5:30
जे प्लॉट धारक बांधकाम करत आहेत, ती बांधकामे आम्हांलाच द्यायची, इतर कुणाला द्यायची नाही.

प्लॉट धारकांचा रस्ता अडवून खेडच्या माजी उपसभापतीने केली खंडणीची मागणी; पोलिसांनी केला गुन्हा दाखल
चाकण : प्लॉट घेतलेल्या नागरिकांचा रस्ता अडवून तो पुन्हा मोकळा करून देण्यासाठी आर्थिक रकमेची मागणी केल्याची घटनासमोर आली आहे.महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी खेड पंचायत समितीचा माजी उपसभापती अमर एकनाथ कांबळे व त्याचा भाऊ अनिल एकनाथ कांबळे यांच्यावर गुरुवारी ( दि.१३ ) खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
धर्मसिंग मुक्त्यारसिंग पाटील ( वय.३९ वर्षे, रा. कुरुळी,ता.खेड ) यांनी याप्रकरणी महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कुरुळी (ता.खेड ) गावातील इंद्रायणी पार्क येथे फिर्यादी पाटील यांनी स्वमालकीचा सन २०२३ साली दोन गुंठे प्लॉट घेतला.फिर्यादी पाटीलयांच्याबरोबर एकूण ३४० नागरिकांनी इंद्रायणी पार्क येथे प्लॉट खरेदी केला आहे.काही प्लॉट धारकांनी त्याठिकाणी आपल्या घराचे बांधकामही सुरु केले आहे.याच प्लॉटला पुणे - नाशिक महामार्गापासून प्रवेश करण्यासाठी जो रस्ता आहे, त्याचा वहिवाटी करारनामा दुय्यम निबंधक यांच्याकडून रीतसर करून घेण्यात आला आहे.
प्रथम करारनामा इंद्रायणी पार्क विकासक यांचा आणि अमर कांबळे व त्याचा भाऊ अनिल कांबळे यांच्या सहमतीने देण्यात आला होता.त्यानंतर तसाच करारनामा विकासक आणि प्लॉट धारक यांच्यात झाला आणि प्लॉटींगसाठी रस्ता देण्यात आला आहे. रस्ता सुरळीत सुरु असताना खेड पंचायत समितीचा माजी उपसभापती अमर कांबळे आणि त्याचा भाऊ अनिल कांबळे यांनी जे प्लॉट धारक बांधकाम करत आहेत, ती बांधकामे आम्हांलाच द्यायची, इतर कुणाला द्यायची नाही.
त्यामुळे ब-याच प्लॉट धारकांनी अजूनही बांधकामे सुरु केली नाहीत. परंतु याच प्लॉटमधील तब्बसुंम बी शेख साजिद पिंजारी ( रा.पिंपळे गुरव ), राजेश बंकटराव जाधव (रा.मोशी), दिनेश रमेश काकुलते व प्रशांत काळडोके यांनी बांधकाम सुरु केले असून, त्यांनी हे बांधकाम अमर कांबळे यांना न देता प्लॉटधारकांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे दुसऱ्यांना दिले आहे.याच गोष्टीचा राग धरून अमर कांबळे व अनिल कांबळे यांनी दि.३१ डिसेंबर २०२४ रोजी एक मोठी कंटेनरची केबिन येणाऱ्या जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या गेटवर ठेवली आहे. सदर रस्ता वहिवाटी करता पूर्णतः बंद केला आहे.तसेच अमर कांबळे व त्याचा भाऊ अनिल कांबळे यांनी तुम्ही बांधकाम कसे करता व प्लॉटवर कसे येता जाता आम्ही बघतोच अशी धमकी दिली. महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाये हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.