अखेर कोथरूडच्या ‘त्या’ मुलींच्या लढ्याला यश; नेमकं प्रकरण काय ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 18:19 IST2025-11-15T18:18:41+5:302025-11-15T18:19:09+5:30
- न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ६ पोलिसांसह आठ जणांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल

अखेर कोथरूडच्या ‘त्या’ मुलींच्या लढ्याला यश; नेमकं प्रकरण काय ?
पुणे : छत्रपती संभाजीनगर पोलिस दलातील पोलिसांसह पुण्यातील कोथरूड पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून मुलींसोबत गैरव्यवहार केला होता. त्यांना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप मुलींनी केला होता. त्यानंतर पुण्यात मोठे आंदोलनं उभे राहिले. पोलिस आयुक्तालयात पीडित मुलींसह त्यांच्या मदतीसाठी आलेल्या अनेकांनी रात्रभर ठिय्या मांडला होता. मात्र, त्यानंतर पुणे पोलिसांनीच या मुलींवर सरकारी कार्यात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर संबंधित मुलींनी थेट पुणे सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती, याप्रकरणी अखेर कोथरूडच्या ‘त्या’ मुलींच्या लढ्याला यश मिळाले आहे. न्यायालाने पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते, तसेच या प्रकरणाचा तपास एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्याचे देखील न्यायालयाने म्हटले होते.
त्यानुसार शनिवारी (दि. १५) कोथरूड पोलिस ठाण्यात पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून ६ पोलिसांसह आठ जणांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील सातारा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल कामठे, पोलिस कर्मचारी संजीवनी शिंदे, सायबर विभागाचे पोलिस अधिकारी धनंजय सानप, पोलिस कर्मचारी विनोद परदेशी, कोथरूड पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक प्रेमा पाटील, पोलिस शिपाई श्रुती कढणे, छत्रपती संभाजीनगर येथील निवृत्त पोलिस कर्मचारी सखाराम सानप आणि एपीआय प्रेमा पाटील यांची एक मैत्रिण अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पोलिसांची नावे आहेत.
नेमकं प्रकरण काय?...
कोथरुडमधील तीन मुलींसोबत तपासादरम्यान पोलिसांकडून गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित मुली आणि विविध संघटनांकडून पुणे पोलिस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी त्या तीन मुली आणि आंदोलन कर्त्यांवरच गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर संबंधित मुली आणि ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, अशा आंदोलनकर्त्यांनी पुणे सत्र न्यायालयात याचिका दाखल करुन पोलिसांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा आणि या प्रकरणाचा तपास एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाच्या विरोधात एपीआय प्रेमा पाटील यांनी आपली बाजू ऐकून घेण्याची विनंती केली होती. मात्र, त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर देखील न्यायालयाने सहा पोलिस अधिकाऱ्यांसह अन्य दोघांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. हे आदेश देताना पोलिसांनी अधिकारांचा गैरवापर केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायालयाने काय सांगितले...
संबंधितांवर दरोडा, अपहरण, ॲट्रॉसिटी आणि अन्य कलमांन्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी आपली ओळख सांगितली नाही. त्यांनी मुलींची तपासणी करून त्यांचा आणि त्यांच्या मैत्रिणींचा जातीय आधारावर अपमान केला, असं कोर्टानं म्हटलं आहे. या आदेशानंतर पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पीडित मुलींसह त्यांना या लढ्यात साथ देणारे शनिवारी सकाळी कोथरूड पोलिस ठाण्यात आले होते. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संबंधितांवर बीएनएस कलम ३१०(२), १४०(३), ७४, ३३३, ६२, ११५(२), ३५२, ३५१(३), ३(५) यासह अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ अन्वये ३(१)(r), ३(१)(s), ३(१)(w)(i), ३(१)(w)(ii) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.