पुणे - चंदननगर परिसरातील एका शाळेत शिकणाऱ्या १४ वर्षीय मुलीवर वर्गात लज्जा उत्पन्न करणारे शब्द बोलल्याप्रकरणी तिच्या शिक्षकावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मंगेश बोराटे (वय ४०, रा. चंदननगर, पुणे) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १ जुलै रोजी १३.४५ वाजता हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, ३ जुलै रोजी रात्री ८.४० वाजता घटनेची नोंद करण्यात आली.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १४ वर्षीय मुलगी संबंधित शाळेत शिकत आहे. शारीरिक शिक्षण (पीटी) शिकवणाऱ्या शिक्षकाने वर्गात मुलींना उद्देशून, “तुझं कुणीतरी आहे का? तुझा बॉयफ्रेंड आहे का ? मुलींनी मुलांकडे बघून स्माईल केली तर मुलांची धडधड वाढते, मुलींनी चांगला व्यायाम केला तर मुलं त्यांना प्रपोज करतील असे वक्तव्य केले. त्यामुळे मुलीला मनात लज्जा वाटली आणि ती अस्वस्थ झाली. या प्रकाराबाबत पीडितेच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पुढील चौकशी केली जात आहे.