डिजिटल अरेस्ट स्कॅम: पुण्यात ज्येष्ठ नागरिकाला १० कोटी ७४ लाखांचा गंडा; सोलापुरातून आरोपी पकडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 17:55 IST2026-03-12T17:53:31+5:302026-03-12T17:55:31+5:30
डिजिटल अरेस्टरद्वारे ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करणाऱ्या टोळीतील आणखी एका आरोपीला केली अटक

डिजिटल अरेस्ट स्कॅम: पुण्यात ज्येष्ठ नागरिकाला १० कोटी ७४ लाखांचा गंडा; सोलापुरातून आरोपी पकडला
पुणे : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाला १० कोटी ७४ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील आणखी एकाला सोलापूरमधून पकडण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. फसवणुकीतील १० कोटी ७४ लाख रुपये हे वेगवेगळ्या ५ हजार ४३६ बँकांमध्ये फिरविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अमर शिवाजी अत्तरंगी (रा. मोदीखाना, सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात अगोदर हर्षद सुभाष धनतोले (रा. कर्वेनगर) आणि समर्थ सुरेश देशमुख (२४, रा. कर्वेनगर) यांना २२ फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती.
फिर्यादी यांनी ३० जानेवारी २०२६ रोजी ७५ लाख रुपये येस बँकेच्या खात्यावर भरले होते. या खात्यावरून महाराष्ट्र बँकेच्या तीन वेगवेगळ्या खात्यांवर एकूण ६ लाख ५० हजार रुपये पाठवण्यात आले होते. सायबर क्राइम पोर्टलद्वारे प्राप्त माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या दोघांना अटक केली होती. हर्षद धनतोले याने एटीएममधून काढलेली रोख रक्कम रोहन जाधव (रा. सांगवी) याला दिल्याचे सांगितले होते. या दोन आरोपींनी वापर केलेल्या बँक खात्याद्वारे एकूण २९ फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
रोहन जाधव याचा शोध घेत असताना त्याचे व अमर अत्तरंगी याचे घनिष्ठ संबंध असल्याचे दिसून आले. फिर्यादी यांनी फसवणूक झालेल्या रकमेपैकी पाच लाख रुपये सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर पाठवण्याचे व त्यानंतर हे पैसे चेकद्वारे कॅश विथड्रॉवल केल्याचे दिसून आले. हे बँक खाते अमर अत्तरंगी याच्या नावे असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर ५ मार्च रोजी त्याच्या शोधासाठी सोलापूरला पथक पाठवण्यात आले.
पोलिसांनी मोदीखाना परिसरातून अमर अत्तरंगी याला पकडून ६ मार्च रोजी अटक केली. अमर अत्तरंगी याच्या तपासात महाराष्ट्रातील गुन्हा उघडकीस आलेला आहे. या गुन्ह्यातील १० कोटी ७४ लाख रुपयांपैकी आतापर्यंत १ कोटी ३४ लाख रुपये गोठवण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांनी केली.