दत्तात्रय गाडेचा जामीन अर्ज फेटाळला;स्वारगेट एस.टी. स्थानकातील अत्याचार प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 09:13 IST2025-07-01T09:12:32+5:302025-07-01T09:13:35+5:30
आरोपीने यापूर्वी पीडितेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केलेला असून तो पुन्हा तसे करू शकतो तसेच पीडितेसाठी कोणतीही संरक्षण योजना न्यायालयासमोर सादर करण्यात आलेली नाही.

दत्तात्रय गाडेचा जामीन अर्ज फेटाळला;स्वारगेट एस.टी. स्थानकातील अत्याचार प्रकरण
पुणे : स्वारगेट एस.टी. स्थानकातील बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा जामीन अर्ज सोमवारी न्यायालयाने फेटाळला. गुरूवारी (दि. २६) गाडे याच्या जामीन अर्जावर आरोपी पक्षासह बचाव पक्षाच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला होता. त्यावर सत्र न्यायाधीश ए. एस. गांधी यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला.
न्यायालयीन कोठडी सुनावल्याने येरवडा कारागृहात असलेल्या गाडे याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला. त्यास सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसार व पीडितेच्या वकील ॲड. श्रीया आवले यांनी विरोध केला. लैंगिक अत्याचार पीडितेच्या इच्छेविरुद्ध व तिच्या संमतीशिवाय केला गेलेला आहे. तपास यंत्रणेचे म्हणणे व आरोपपत्रातील तपशील यांचा संदर्भ देत विशेष सरकारी वकिलांनी असे निर्देशित केले की काही अत्यंत महत्त्वाचे व निर्णायक पुरावे तपासात आले असून, ते आरोपीच्या दोषारोपावर प्रथमदृष्ट्या प्रकाश टाकतात. या पुराव्यांमध्ये विविध पंचनामे, तज्ज्ञांचे अभिप्राय, लोकेशन ट्रेसेस आदींचा समावेश होता जे स्पष्टपणे दर्शवतात. आरोपी व पीडिता यांच्यात पूर्वी कोणताही संपर्क नव्हता व त्यांच्यात कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही.
पीडितेच्या वतीने ॲड. श्रीया आवले यांनी असा युक्तिवाद केला की, आरोपीने यापूर्वी पीडितेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केलेला असून तो पुन्हा तसे करू शकतो तसेच पीडितेसाठी कोणतीही संरक्षण योजना न्यायालयासमोर सादर करण्यात आलेली नाही. या सर्व बाबींचा विचार करता आरोपीस जामीन दिला जाऊ नये, असा युक्तिवाद केला. तर, आरोपी व पीडिता यांच्यातील लैंगिक संबंध परस्पर संमतीने झालेले आहेत. असे कोणतेही कृत्य घडलेच नाही. आरोपीचे पूर्वीचे गुन्हे हे स्त्रियांवरील लैंगिक अत्याचाराचे नसून, चोरी व दरोड्याचे असल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आला होता.
स्वारगेट बसस्थानकात २५ फेब्रुवारीला पहाटे एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्काराची घटना घडली होती. आरोपी सध्या हा न्यायालयीन कोठडीत असून, त्याने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्या अर्जावर गुरुवारी सुनावणी पूर्ण झाली होती.