पुण्यात महिलेला मॅट्रोमोनियल साईटवरून कोटींचा गंडा;पोलिसांनी ठगाला ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 19:11 IST2025-06-26T19:10:32+5:302025-06-26T19:11:19+5:30

- पीडित महिला आणि आरोपी डॉ. रोहित ओबेरॉय पुणे तसेच भारतातील इतर ठिकाणी एकत्र राहिले.

Pune crime cyber police arrests fraudster who duped woman of Rs 3.60 crores through matrimonial site | पुण्यात महिलेला मॅट्रोमोनियल साईटवरून कोटींचा गंडा;पोलिसांनी ठगाला ठोकल्या बेड्या

पुण्यात महिलेला मॅट्रोमोनियल साईटवरून कोटींचा गंडा;पोलिसांनी ठगाला ठोकल्या बेड्या

पुणे - पुण्यातील खराडी भागात राहणाऱ्या एका महिलेने शादी डॉट कॉम या मॅट्रिमोनिअल वेबसाईटवर लग्नासाठी तिचे प्रोफाईल (क्र. SH87341231) तयार केले होते. सन २०२३ मध्ये, डॉ. रोहित ओबेरॉय नावाच्या एका ऑस्ट्रेलियन नागरिकाने (मूळ भारतीय) तिला मेसेज करून ओळख वाढवली. मैत्री झाल्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून विश्वास जिंकला. पीडित महिला आणि आरोपी डॉ. रोहित ओबेरॉय पुणे तसेच भारतातील इतर ठिकाणी एकत्र राहिले.

पीडित महिलेला तिच्या पहिल्या पतीकडून घटस्फोटानंतर ५ कोटी रुपये पोटगी मिळाली होती. ही माहिती आरोपीला कळल्यावर त्याने तिचा गैरफायदा घेतला. पीडित महिला लहान मुलांसाठी 'माइंडफुलनेस अँड स्पिरिच्युअ‍ॅलिटी' (Mindfullness and spirituality) कार्यक्रम घेऊन व्यवसाय सुरू करण्याच्या प्रयत्नात होती. याचा फायदा घेत आरोपीने तिला हा व्यवसाय आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी निधी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. यासाठी त्याने सिंगापूरमधील इव्हॉन हँन्दयानी आणि विन्सेंट कुआण या व्यक्तींसोबत संगनमत करून पीडितेला सिटी बँक सिंगापूर आणि भारतातील काही बँकांमध्ये वेळोवेळी ३ कोटी ६० लाख १८ हजार ५४० रुपये भरण्यास भाग पाडले.

फसवणुकीचा उलगडा आणि आरोपीला अटक

काही काळानंतर डॉ. रोहित ओबेरॉय ऑस्ट्रेलियाला गेला आणि पीडितेशी बोलणे टाळू लागला. त्याने आपल्याला तोंडाचा कर्करोग झाला असून तब्येत खालावत असल्याचे भासवून पीडितेशी कायमचा संपर्क तोडला. सप्टेंबर २०२४ मध्ये, त्याचा साथीदार विन्सेंट कुआण याने पीडितेला ईमेल करून डॉ. रोहित ओबेरॉयचा मृत्यू झाल्याचे सांगितले. पीडितेने ही बाब तिच्या मैत्रिणीला सांगितल्यावर हा एक प्रकारचा फ्रॉड असू शकतो असे तिला सांगण्यात आले. त्यानंतर पीडितेने सर्व गोष्टी पडताळून पाहिल्या असता तिला डॉ. रोहित ओबेरॉय, इव्हॉन हँन्दयानी आणि विन्सेंट कुआण यांनी तिची आर्थिक फसवणूक केल्याची खात्री पटली.

तांत्रिक विश्लेषणातून असे निष्पन्न झाले की, पीडितेला फसवणाऱ्या व्यक्तीचे खरे नाव डॉ. रोहित ओबेरॉय नसून अभिषेक शुक्ला असे आहे. तो मूळचा लखनऊचा असून सध्या ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे राहतो. आरोपी परदेशात असल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ त्याच्या नावाचे लुक आऊट सर्क्युलर (LOC) जारी करण्यात आले. २५ जून २०२५ रोजी आरोपी सिंगापूरहून मुंबईला येणार असल्याची माहिती मिळताच, मुंबई विमानतळावर त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत आहे.

सायबर पोलिसांकडून पुढील तपास सुरू

तपासात असे समोर आले आहे की, आरोपी डॉ. रोहित ओबेरॉय उर्फ अभिषेक शुक्लाने shaadi.com वर बनावट प्रोफाईल तयार करून एकूण ३,१९४ महिलांशी संपर्क साधला होता. त्यामुळे सायबर पोलीस या आरोपीने आणखी किती महिलांना लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक गंडा घातला आहे, याचा तपास करत आहेत.

अशा मेट्रोमोनियल साइटवर कोणीही बळी पडू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. - पंकज देशमुख, अपर पोलिस आयुक्त  

Web Title: Pune crime cyber police arrests fraudster who duped woman of Rs 3.60 crores through matrimonial site

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.