बसमध्ये लपवून नेला जात होता क्रिस्टल मेथ; परदेशी महिला अटकेत, ७.६३ कोटींचा साठा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 10:14 IST2025-07-18T10:13:35+5:302025-07-18T10:14:02+5:30
जप्त केलेल्या क्रिस्टल मेथचे वजन ३.८१५ किलो असून, त्याची बेकायदेशीर बाजारमूल्य सुमारे ७.६३ कोटी रुपये इतकी आहे.

बसमध्ये लपवून नेला जात होता क्रिस्टल मेथ; परदेशी महिला अटकेत, ७.६३ कोटींचा साठा जप्त
पुणे - महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) विशिष्ट माहितीनुसार मोठी कारवाई करताना अधिकाऱ्यांनी बेंगळुरूकडे जाणाऱ्या बसमध्ये लपवलेले अंमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणात एका परदेशी महिला नागरिकेला अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या क्रिस्टल मेथचे वजन ३.८१५ किलो असून, त्याची बेकायदेशीर बाजारमूल्य सुमारे ७.६३ कोटी रुपये इतकी आहे.
कसा उलगडा झाला साठ्याचा?
दिल्लीहून बेंगळुरूकडे बसने प्रवास करणारी महिला मानसोपचारजन्य (Psychotropic) पदार्थ घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर, DRI पुणे प्रादेशिक युनिट आणि सीमाशुल्क विभागाने मुंबई–बेंगळूरू महामार्गावर संशयित बस थांबवून तपासणी केली. सुरुवातीला तपासात काहीही आढळले नाही. मात्र, बसची तपासणी केल्यावर तिची आणखी एक बॅग मागील बाजूस लपवून ठेवलेली सापडली.
या बॅगेत सहा सलवार सूट होते. प्रत्येक सूटमध्ये खास तयार केलेल्या गत्त्याच्या पोकळ जागेत पांढऱ्या स्फटिकासारख्या पदार्थाने भरलेल्या प्लास्टिक पिशव्या सापडल्या. फील्ड टेस्टमध्ये हा पदार्थ अॅम्फेटामिन असल्याचे स्पष्ट झाले.
महिलेची अटक; NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल
क्रिस्टल मेथचा हा साठा जप्त करून परदेशी महिलेवर NDPS कायदा १ ९ ८ ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पुढील तपास सुरू असून, अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महसूल गुप्तचर संचालनालय अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी सातत्याने कारवाई करत असून, देशाची सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी ही संस्था महत्त्वाची भूमिका बजावत आहे.