तू माझ्यासोबत चल,नाहीतर; खेड तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 18:19 IST2025-09-02T18:18:33+5:302025-09-02T18:19:16+5:30
मी माझ्या जिवाचे काहीतरी करेन.’’ या धमकीने घाबरलेल्या मुलीला त्याने गाडीत बसवून पुण्याला नेले...

तू माझ्यासोबत चल,नाहीतर; खेड तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक
राजगुरुनगर : खेड तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर धमकी देऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी अजय दादाभाऊ गावडे (रा. वडाचीवाडी, केंदुर, ता. शिरूर) याला खेड पोलिसांनी अटक केली आहे.
ही पीडित मुलगी खेड तालुक्यातील रहिवासी आहे. आरोपी हा पीडित मुलीच्या बहिणीचा पती आहे. दि. २८ ऑगस्ट रोजी रात्री आरोपी खेड येथे पीडित मुलीच्या घरी आला. त्याने पीडित मुलीला फोनवरून सांगितले की, ‘‘मला कांद्याची गाडी खाली करण्यासाठी पुण्याला जायचे आहे. तू माझ्यासोबत चल, नाहीतर मी माझ्या जिवाचे काहीतरी करेन.’’ या धमकीने घाबरलेल्या मुलीला त्याने गाडीत बसवून पुण्याला नेले आणि नंतर शिक्रापूर, जाधव वस्ती (ता. शिरूर) येथे आणले. तिथे भाड्याच्या खोलीत दोन दिवस तिच्यावर वारंवार बलात्कार केला. पीडित मुलीने आरोपीला घरी सोडण्याची विनंती केली, परंतु त्याने ‘‘तू माझ्यासोबतच राहायचे, नाहीतर मी तुझ्या बहिणीला मारून टाकीन’’ अशी धमकी दिली.
दि. ३१ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीचे आई-वडील आणि चुलते तिला शोधत जाधव वस्ती येथे पोहोचले. त्यांना पाहताच आरोपी मुलीला खोलीवर सोडून पळून गेला. पीडित मुलीने आपल्या कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला आणि खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. खेड पोलिसांनी आरोपी अजय दादाभाऊ गावडेला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.