Pune Crime : आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या आरोपावरुन सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 21:10 IST2025-06-26T21:09:07+5:302025-06-26T21:10:15+5:30

पैशासाठी तगादा लावून,मारहाण करुन एकास आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या आरोपावरुन आवारेवस्ती (बावडा) येथील अनोळखी इसमांसह सहा जणांविरुद्ध गुरुवारी ( दि.२६) इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Pune Crime Case registered against six people for abetting suicide | Pune Crime : आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या आरोपावरुन सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Crime : आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या आरोपावरुन सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

इंदापूर : पैशासाठी तगादा लावून,मारहाण करुन एकास आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या आरोपावरुन आवारेवस्ती (बावडा) येथील अनोळखी इसमांसह सहा जणांविरुद्ध गुरुवारी ( दि.२६) इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अक्षय पोपट शिंदे,विजय सतीश आवारे (दोघे रा. आवारेवस्ती बावडा) व चार अनोळखी इसमांचा आरोपींमध्ये समावेश आहे.सागर माणिक जाधव (वय ३१ वर्षे, रा.आवारेवस्ती बावडा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याचे बंधू सचिन माणिक जाधव यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

 सविस्तर माहिती अशी की, सागर जाधव हा इंदापूरात ज्ञानदिप पॅरामेडीकल ही संस्था चालवत होता. मागील सहा महिन्यापुर्वी त्याने आरोपी अक्षय शिंदे याला संस्थेचे फर्निचर बनवण्याचे काम दिले होते. त्या कामाचे बील १ लाख १५ हजार रुपये झाले होते. त्यातील ५० हजार रुपये सागरने शिंदे यास दिले होते. उर्वरित ६५ हजार रुपये द्यावेत यासाठी शिंदे याने सागरकडे तगादा लावला होता. दि.२३ जून रोजी रोख पैसे देतो असे त्याला सागरने सांगितले होते.त्याच दिवशी शिंदे हा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयात असणाऱ्या सागरकडे आला.त्याच्या गाडीची चावी काढुन घेतली. तो सोबत काही युवकांना घेऊन आला होता.सागरने फिर्यादी सचिन यास हा प्रकार सांगितला.शिंदे याने मला मारण्यासाठी मुले आणली आहेत. तू लवकर ये असा निरोप दिला.

बारा वाजता सचिन सागरकडे आला. तेथे असलेल्या शिंदेला पैशाची जुळवाजुळव झाली की पैसे देतो असे सांगून तो सागरला घेवून घराकडे निघाला. त्या दोघांना इंदापूर अकलूज रस्त्यावरील कांदा मार्केटजवळ दुचाकी आडवी लावून शिंदे व त्याच्या बरोबर आलेल्या सतीश आवारे याने अडवले. त्यांच्या दुचाकीची चावी काढून घेतली. त्याच वेळी बावडा बाजुकडून आलेल्या लाल रंगाच्या स्विफ्ट कारमधून दोन अनोळखी इसम तेथे आले. शिंदे व आवारे यांनी जाधव बंधूंना मारहाण केली.

सचिन व सागर घरी आल्यावर अक्षय शिंदे व तीन अनोळखी इसम तीच स्विफ्ट गाडी घेऊन सचिनच्या घरी आले.तू इंदापूरला चल तुला मारायचे आहे असे म्हणत त्या अनोळखी इसमांपैकी एकाने सचिन व त्याच्या कुटुंबियांना शिवीगाळ केली. त्यानंतर ते सर्व जण तेथून निघून गेले.सायंकाळी सव्वाचार वाजता इंदापूर पोलीस ठाण्यात जावून जाधव बंधूंनी घडलेल्या सर्व प्रकाराबद्दल तक्रार नोंदवली.

मात्र या प्रकरणामुळे सागर अस्वस्थ झाला होता. घरामध्ये कोणाशी काही बोलत नव्हता.मंगळवारी (दि. २५) रात्री सव्वानऊ वाजता सर्वांनी एकत्रित जेवण केले. गुरुवारी सकाळी सहा वाजता सागरने घराच्या स्वयंपाक घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. इंदापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Pune Crime Case registered against six people for abetting suicide