कुख्यात गुंड सूर्यकांत आंदेकरसह चौघांवर गुन्हा नोंद; बनावट दस्तप्रकरण, उत्तमनगर पोलिसांत गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 10:06 IST2025-10-16T10:03:23+5:302025-10-16T10:06:40+5:30
बांधकाम झाल्यानंतर मात्र, त्यांनी तक्रारदार यांची संमती न घेता त्या फ्लॅटची विक्री करून पैशांचा अपहार केला, तसेच बनावट खरेदी दस्त तयार केला

कुख्यात गुंड सूर्यकांत आंदेकरसह चौघांवर गुन्हा नोंद; बनावट दस्तप्रकरण, उत्तमनगर पोलिसांत गुन्हा
पुणे : नातवाच्या खून प्रकरणात कारवाई झालेल्या कुख्यात गुंड सूर्यकांत राणोजी आंदेकर याच्यासह उत्तमनगरमधील तिघांवर बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २००९ पासून २०२४ पर्यंत हा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात महेश रामचंद्र तिखे, सूर्यकांत राणोजी आंदेकर, अविनाश रामचंद्र पवार आणि अविनाश पवार याचा भाऊ (नाव पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ७० वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोंढवे धावडे भागातील रहिवासी आहेत. ते बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची येथे ५५ आर क्षेत्र जागा होती. ती त्यांनी आरोपींना विश्वासाने कुटुंबीयांना बांधकाम करण्यास दिली होती.
बांधकाम झाल्यानंतर मात्र, त्यांनी तक्रारदार यांची संमती न घेता त्या फ्लॅटची विक्री करून पैशांचा अपहार केला, तसेच बनावट खरेदी दस्त तयार केला. त्याचा वापर करून बेकायदेशीररीत्या कर्ज घेतले, तर त्यांच्या जागेचा बेकायदेशीररीत्या ताबा घेतला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन खंदारे करीत आहेत.