कोथरुडमध्ये कार चालकाने उडवल्या पाच दुचाकी;चालकाविरोधात गुन्हा दाखल पोलिसांनी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 20:05 IST2025-05-11T20:03:52+5:302025-05-11T20:05:40+5:30
कोथरूड येथील निंबाळकर चौक, युफोरिया बाय, खेळीया सिटी प्राईड या परिसरात घडली.

कोथरुडमध्ये कार चालकाने उडवल्या पाच दुचाकी;चालकाविरोधात गुन्हा दाखल पोलिसांनी घेतले ताब्यात
कोथरूड : कोथरुड परिसरात एका थार वाहनचालकाने पाच ते सहा वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र, दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. दरम्यान पोलिसांनी थार चालकाला रविवारी ताब्यात घेतले. ही घटना शनिवारी रात्री नऊच्या सुमारास कोथरूड येथील निंबाळकर चौक, युफोरिया बाय, खेळीया सिटी प्राईड या परिसरात घडली.
हृषीकेश सुंदर पुजारी (वय 33) असे ताब्यात केलेल्या कार चालकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी रात्री हृषीकेश पुजारी हा थार गाडीतून (एम एच 12 यू.एन.1306) हा कोथरुड परिसरातून सिटी प्राईडकडे निघाला होता. सिटी प्राईड परिसरात आल्यानंतर त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले त्यामुळे रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या सुमारे पाच-सहा दुचाकीला धडक देत गाडी पुढे गेली. त्यानंतर त्याने तेथून पळ काढला, परिसरातील नागरिकांनी तातडीने पोलिसांना संपर्क केला.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला. काही नागरिकांनी त्याच्या गाडीचा नंबर पाहिला असल्याने गाडीच्या नंबरवरून पोलिसांनी रविवारी सकाळी त्याचे घर गाठले व घरून हृषीकेश सुंदर पुजारी याला ताब्यात घेतले. त्याने मद्दप्राशन करून गाडी चालविली होती का? याचा तपास करण्यासाठी त्याची ससूनमध्ये वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. अद्याप चाचणीचा अहवाल आला नसून चाचणी अहवाल आल्यानंतर नेमका अपघात कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे.
काळ्या रंगाच्या काचा
थारच्या सर्व बाजूच्या काचांना अगदी डार्क फिल्म लावण्यात आली असल्याने गाडीच्या काचा पूर्ण काळ्या आहेत, गााडीच्या आतील बाजूचे काहीच दिसत नाही. कायद्यानुसार फिल्म लावण्यास बंदी असतानाही अशी फिल्म लावल्या जात आहे. विशेषत: कर्वे रोड, लॉ कॉलेज रस्ता या भागात ड्रायव्हर समोरील काचेवरही काळ्या रंगाच्या फिल्म लावलेल्या अनेक गाड्या वारंवार आढळतात. त्यामुळे काचेचा पारदर्शीपणा कमी होऊन अपघाताची शक्यता अधिक बळावते मात्र वाहतूक पोलिसांकडून त्यावर कारवाई केली जात नाही.