पुणे : कोरेगाव पार्क येथील एका एव्हिएशन क्षेत्रातील उद्योगपतीला पाकिस्तानमधून आलेल्या व्हॉट्स ॲप कॉल्स व व्हाईस नोट्सद्वारे जीवे मारण्याची धमकी देत ५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी हे एका कंपनीचे संचालक असून, भारतासह दुबई, इंग्लंडमध्येही त्यांचा व्यवसाय आहे. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री त्यांच्या मोबाईलवर पाकिस्तानी देशाच्या मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्स ॲप मेसेज व कॉल आला. त्यानंतर सलग काही व्हाईस नोट्स येत राहिल्या. त्यामध्ये हेलिकॉप्टर खरेदी केल्यानंतर खंडणी द्यावी लागते, असे सांगून थेट ५ कोटींची मागणी केली. एका नोटमध्ये ''तुझं सगळं माहीत आहे'' अस म्हणत त्यांना धमकवण्यात आले. २८ फेब्रुवारी व १६ मार्च रोजीही वेगवेगळ्या क्रमांकांवरून पुन्हा धमकीचे मेसेजेस व व्हाईस नोट्स आल्या.
''तीन दिवस देतोय, नाही दिलेस तर बघ मी काय करतो'', असा इशाराही देण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून कॉल्स व मेसेजेस खरोखरच पाकिस्तानहून आलेत का, की प्रॉक्सी सर्व्हरचा वापर झाला आहे, हे तपासले जात आहे. यासंदर्भातील सायबर पुरावे गोळा करून सायबर सेलकडे तपास सोपवण्यात आला आहे.