लाचखोर जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यासह उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 11:28 IST2025-03-14T11:23:50+5:302025-03-14T11:28:58+5:30

या दोन कामाची वर्कऑर्डर मिळाली होती. या कामाच्या रक्कमेमध्ये जीएसटी व इतर कर अशी दोन्ही कामाची बिल रक्कम ४० लाख रुपये होत आहे.

pune crime Bribery of the Executive Engineer of the Zilla Parishad, along with the Deputy Engineer and Junior Engineer Gajaad | लाचखोर जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यासह उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता गजाआड

लाचखोर जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यासह उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता गजाआड

पुणे -  शासकीय ठेकेदाराकडून दोन कामाच्या बिलाची फाईल मंजूर करण्याकरीता व बिल देण्याकरीता कामाच्या बिलाच्या रक्कमेच्या २ टक्के प्रमाणे पैसे मागितल्या प्रकरणी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंत्यासह दौंड शिरूर उपविभागाचे उपअभियंता तसेच दौंडचे कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत विभागाने गजाआड केले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

कार्यकारी अभियंता बाबुराव कृष्णा पवार (वय ५७), उपविभाग दौंड शिरूरचे उप अभियंता दत्तात्रेय भगवानराव पठारे (वय ५५), दौंडच्या कनिष्ठ अभियंता अंजली प्रमोद बगाडे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत लाचलुचपत विभागाने दिलेली माहिती अशी की तक्रारदार हे शासकीय ठेकेदार आहेत.

जिल्हा परिषदेच्या दक्षिण बांधकाम विभागाने दौंड तालुक्यातील खुटबाव रोड ते गलांडवाडी पांदन शिव रस्ता व गलांडवाडी मंदिर ते ज्ञानदेव कदम घर रस्ता या कामाचे टेंडर सप्टेंबर २०२४ मध्ये प्रसिद्ध केले होते. त्यांना या दोन कामाची वर्कऑर्डर मिळाली होती. या कामाच्या रक्कमेमध्ये जीएसटी व इतर कर अशी दोन्ही कामाची बिल रक्कम ४० लाख रुपये होत आहे. हे काम केल्यानंतर दि. ३ मार्च २०२५ रोजी यातील दौंडच्या कनिष्ठ अभियंता अंजली बगाडे यांनी केलेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन पुणे जिल्हा परिषदे कडील एस क्यू एम कमिटी केलेल्या कामाची पाहणी करुन अहवाल देईल.

त्यासाठी त्या कमिटीकरीता प्रत्येक कामापोटी ७,००० रुपये असे १४,००० रुपयाची लाच मागणी केली. तसेच कामाच्या बिलाची फाईल तयार करुन मंजूरीसाठी ऑनलाईन सादर करण्यासाठी रक्कमेच्या २ टक्के  प्रमाणे ८०,००० रुपयाच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर उप अभियंता  दत्तात्रेय पठारे यांना भेटले असता, त्यांनी तक्रारदाराकडे दोन कामाच्या बिलाची फाईल तपासुन ती फाईल वरिष्ठ अधिकारी  यांचेकडे पाठवण्यासाठी कामाच्या बिलाच्या रक्कमेच्या २ टक्के प्रमाणे म्हणजे ८०,००० रुपयाच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता  बाबुराव पवार यांना भेटले असता, त्यांनीसुद्धा दोन कामाच्या बिलाची फाईल मंजूर  करण्याकरीता व बिल देण्याकरीता कामाच्या बिलाच्या रक्कमेच्या २ टक्के प्रमाणे म्हणजे ८०,००० रुपये लाच मागणी केली अशी तक्रार तक्रारदार यांनी १० मार्चला लाचलूचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे दिली.

या तक्रारीच्या अनुषंगाने  ११ मार्चला त्या तिघांची पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता,  अंजली बगाडे यांनी कामाच्या ठिकाणी जाऊन तपासणी करुन अहवाल देणा-या एस क्यूं एम टीमसाठी तक्रारदाराध्या प्रत्येक कामाचे ७,००० प्रमाणे दोन कामाचे १४,००० रुपयाच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न  झाले. तसेच दत्तात्रेय पठारे यांनी दोन कामाच्या  बिलाची फाईल तपासणी करुन वरिष्ठांकडे  मंजुरीसाठी पाठवण्यासाठी तडजोडीअंती ६४,००० रुपयाच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

कार्यकारी अभियंता बाबुराव पवार यांनी दोन कामाच्या बिलाची फाईल मंजुर करुन बिल काढण्यासाठी तडजोडीअंती ६४,००० रुपये लाचेची  मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार  १३ मार्चला  केलेल्या सापळा कारवाई दरम्यान बाबुराव पवार यांनी ६४,००० रुपये पंचासमक्ष स्किारले तसेच दत्तात्रेय पठारे यांनी ६४,००० रुपये व अंजली बगाडे यांनी मागणी केलेले १४,००० रुपये असे ७८,००० रुपये पंचासमक्ष स्विकारले असता त्याना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे. अंजली बगाडे यांनी १४,००० रुपये लाच मागणी करून, ती रक्कम दत्तात्रय पठारे यांचेकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

पवारांच्या कार्यालयात मिळाले साडेआठ लाख

कार्यकारी अभियंता बाबुराव पवार यांच्या कार्यालयात रात्री उशिरापर्यंत ठेकेदारांची गर्दी असते.वारंवार यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही तक्रारी गेल्या होत्या मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. लाच प्रकरणी लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांच्या कार्यालयाची झडती घेतली असता कार्यालयात असणारे एका बॅगेमध्ये  ८,५८,४०० /- रुपये अशी रोख रक्कम मिळून आली असून, ती रक्कम तपासकामी ताब्यात घेण्यात आली असून, त्याबाबत चौकशी सुरु आहे.

 

Web Title: pune crime Bribery of the Executive Engineer of the Zilla Parishad, along with the Deputy Engineer and Junior Engineer Gajaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.