Pune Crime : काळा रंगाची मोटरसायकल,निळ्या रंगाचे जॅकेट; दरोडेखोरांचा फोटो आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 16:38 IST2025-07-01T16:35:17+5:302025-07-01T16:38:54+5:30
सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथील ‘गजानन ज्वेलर्स’ या दागिन्यांच्या दुकानावर चार अज्ञात दरोडेखोरांनी भरदिवसा कोयत्याने हल्ला करत लाखोंचा ऐवज लुटला.

Pune Crime : काळा रंगाची मोटरसायकल,निळ्या रंगाचे जॅकेट; दरोडेखोरांचा फोटो आला समोर
पुणे : शहरातील सुरक्षेच्या दाव्यांना धक्का देणारी घटना आज (दि. ० १) मंगळवारी दुपारी घडली. सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथील ‘गजानन ज्वेलर्स’ या दागिन्यांच्या दुकानावर चार अज्ञात दरोडेखोरांनी भरदिवसा कोयत्याने हल्ला करत लाखोंचा ऐवज लुटला. या हल्ल्यात दुकानमालक आणि एक कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सकाळी ११ च्या सुमारास घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरोडेखोरांनी थेट दुकानात शिरून, काहीही न बोलता कोयत्याने सपासप वार करत दुकानातील लोकांना जखमी केले. त्यानंतर दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज उचलून ते पसार झाले. समोर आलेल्या माहितीनुसार या दरोडेखोरांचा फोटो समोर आला आहे.
समोर आलेल्या फोटोत सदर गाडीवरील इसम हे गजानन ज्वेलर्स या दुकानातून दरोडा टाकून वडगावच्या दिशेने रवाना झालेले आहेत. सदर मोटरसायकल ही काळा रंगाची असून त्यावर तीन इसम असून पुढे बसलेले इसमाने निळ्या रंगाचे जॅकेट व ग्रे कलरची पॅन्ट व मागे बसलेल्या इसमाने गुलाबी रंगाची हुडी व ब्लॅक रंगाची पॅन्ट परिधान केलेले आहे.सदर गाडी मिळवताच त्याचप्रमाणे इसम मिळवताच ताब्यात घेण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहे.
तत्पूर्वी, घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परंतु, या घटनेनंतर नागरिकांमधून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. भरदिवसा, मुख्य रस्त्यावर असलेल्या दुकानात दरोडा पडतो, आणि पोलिसांना याची खबर लागते तेव्हा सगळं उरकून दरोडेखोर पसार होतात, ही बाब गंभीर आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केल्याचा दावा केला असला, तरी दरवाढती गुन्हेगारी आणि दिवसाढवळ्या अशा घटनांनी पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.