Pune Crime : मारहाण, गोळीबार, घरफोडी.. कोथरूड असुरक्षित; वरिष्ठ निरीक्षकावर कोणाचा वरदहस्त ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 11:57 IST2025-10-01T11:56:41+5:302025-10-01T11:57:54+5:30
कोथरूड पोलिस नेमके करतात काय? परिसरातील गुंडांना आता पोलिसांचं अजिबात भय उरलं नसल्याचं हे प्रकार दाखवून देत आहेत.

Pune Crime : मारहाण, गोळीबार, घरफोडी.. कोथरूड असुरक्षित; वरिष्ठ निरीक्षकावर कोणाचा वरदहस्त ?
पुणे - गेल्या काही दिवसांपासून कोथरूड पोलीस स्टेशन सातत्याने चर्चेत आहे. परिसरात वारंवार घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत चालली आहे. परंतु, इतक्या गंभीर घटनांनंतरही कोथरूड पोलीस स्टेशनकडून ठोस कारवाई दिसून येत नाही, हे नागरिकांमध्ये संतापाचं कारण ठरत आहे.
सुरुवातीला गजा मारणे याच्या गुंडांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. त्यानंतर कुख्यात निलेश घायवळ टोळीने थेट सर्वसामान्य नागरिकांना मारहाण करत गोळीबाराची घटना घडवली. आता याच मालिकेत आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका तरुणाने हातात बंदूक घेऊन सोसायटीत प्रवेश केला आहे. या घटनांमुळे कोथरूड परिसर गुंडगिरीच्या छायेखाली असल्याचं स्पष्ट होत आहे. या घटनांच्या मालिकेनंतर नागरिक एकच प्रश्न विचारत आहेत की, कोथरूड पोलिस नेमके करतात काय? परिसरातील गुंडांना आता पोलिसांचं अजिबात भय उरलं नसल्याचं हे प्रकार दाखवून देत आहेत.
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे शिस्तप्रिय व कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जातात. अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची त्यांची ख्याती आहे. मात्र, कोथरूड पोलीस स्टेशनच्या बाबतीत त्यांच्या नजरा झाकल्या जात आहेत काय, असा प्रश्न उपस्थित होतो. कारण, वारंवार गंभीर गुन्हे घडत असतानाही या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कुठलीच ठोस कारवाई होताना दिसत नाही.
परिसरातील नागरिकांमध्ये आता संशय व्यक्त केला जात आहे की, कोथरूडच्या वरिष्ठ निरीक्षकावर कोणाचा वरदहस्त आहे? इतक्या मोठ्या घटना घडूनही जर वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्तांचे अभय असेल, तर पुढे कोथरूड परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचं भवितव्य काय, हा गंभीर सवाल उपस्थित होत आहे. पुणेकर नागरिक आता अपेक्षा व्यक्त करत आहेत की, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून कोथरूड पोलीस स्टेशनमधील अकार्यक्षमता संपवली जावी आणि परिसर पुन्हा एकदा सुरक्षित करण्यात यावा.