Ayush Komkar : दहशतीच्या जोरावर आंदेकर टोळीने कमावली १८ कोटींची मालमत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 19:49 IST2025-09-28T19:49:18+5:302025-09-28T19:49:38+5:30
आंदेकर कुटुंबीय तसेच टोळीतील साथीदारांच्या ३७ बँक खात्यातील एक कोटी ४७ लाख रुपयांची रक्कमही गोठवण्यात आली आहे.

Ayush Komkar : दहशतीच्या जोरावर आंदेकर टोळीने कमावली १८ कोटींची मालमत्ता
पुणे : नाना पेठेतील टोळीयुद्धातून झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात पोलिसांनी आंदेकर टोळीविरोधात कडक कारवाईची पावले उचलली आहेत. आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह त्याच्या कुटुंबीयांची १७ कोटी ९८ लाख ९३ हजार रुपयांची मालमत्ता तपासात निष्पन्न झाली आहे. आंदेकर कुटुंबीय तसेच टोळीतील साथीदारांच्या ३७ बँक खात्यातील एक कोटी ४७ लाख रुपयांची रक्कमही गोठवण्यात आली आहे.
गेल्यावर्षी १ सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा नाना पेठेत गोळ्या झाडून खून केला होता. वनराजच्या खून प्रकरणात बंडू आंदेकरचा जावई गणेश कोमकर, मुलगी संजीवनी, तिचा दीर जयंत तसेच सोमनाथ गायकवाडसह साथीदारांना अटक केली होती. वनराजच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ५ सप्टेंबर २०२५ रोजी नाना पेठेतील लक्ष्मी काॅम्प्लेक्स सोसायटीच्या आवारात गणेश कोमकर याचा १८ वर्षीय मुलगा आयुष याच्यावर बेछूट गोळीबार करून खून केला होता.
आंदेकर टोळीतील अमन पठाण आणि यश पाटील यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. पोलिस तपासात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू याने वनराजच्या खुनाचा बदला घेण्यासाठी स्वत:चा नातू आयुष याचा खून घडवून आणला होता. या प्रकरणात आंदेकर याच्यासह १६ जणांना अटक केली. वनराजची पत्नी सोनाली, आंदेकरची विवाहित मुलगी वृंदावनी वाडेकर, तिची मुले, पुतणे शिवम, अभिषेक, शिवराज, त्यांची आई माजी नगरसेविका लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांना अटक केली. तपासात दोन पिस्तूल, चार कार, चार दुचाकी, २८ मोबाईल, आंदेकरच्या घरातून सोन्याचे दागिने असा ९५ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आंदेकर कुटुंबीय तसेच त्याच्या टोळीतील साथीदारांच्या ३७ बँक खात्यांतील एक कोटी ४७ लाख रुपयांची रक्कम गोठवण्यात आली आहे.
आयुष कोमकर खून प्रकरणात मकोका कारवाई केली आहे. आंदेकर कुटुंबीयांची मालमत्ता निष्पन्न झाली आहे. बंडू आंदेकरची फुरसुंगी येथे २४.५ गुंठे जागा, कोथरूडमध्ये दोन फ्लॅट, दोन दुकाने, तीन मजली घर, नाना पेठेत फ्लॅट, लोहियानगर भागात दोन खोल्या, हडपसरमधील साईनाथ वसाहतीत एक खोली अशी मालमत्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आंदेकरची मुलगी वृंदावनी वाडेकर हिच्या नावावर तीन मजली घर, एक टपरी, साईनाथ वसाहतीत एक खोली, शिवम आंदेकरच्या नावावर मुळशीतील आगळांबे गावात २२ गुंठे जागा, कोथरूड, नाना पेठेत दोन फ्लॅट, दुकान, शिवराज आंदेकरच्या नावावर नाना पेठेत एक फ्लॅट, सोनाली आंदेकरच्या नावावर नाना पेठेत दोन दुकाने आहेत. १६ करारनामे, त्याच्याशी संबंधित मालमत्तांबाबत तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.
बंडू आंदेकर, त्याची मुलगी वृंदावनी वाडेकर यांच्या घराच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण नष्ट केल्याप्रकरणी आंदेकरचा विश्वासू साथीदार मोहन चंद्रकांत गाडेकर याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला १० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.