Pune Crime : दारूचे पैसे न दिल्याचा संताप; मुलाने केला आईच्या खुनाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 12:17 IST2025-08-17T12:17:26+5:302025-08-17T12:17:41+5:30
तो काही कामधंदा करत नाही. तो दारू पिण्यासाठी सतत पैशांची मागणी करून आईला त्रास देत होता.

Pune Crime : दारूचे पैसे न दिल्याचा संताप; मुलाने केला आईच्या खुनाचा प्रयत्न
पुणे : दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकाने आईवर चाकूने वार केल्याची घटना सिंहगड रोडवरील सावित्रीबाई फुले वसाहतीत घडली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पर्वती पोलिसांनी मुलाला अटक केली. कौशल्या पप्पू कांबळे (५५, रा. सावित्रीबाई फुले वसाहत, सिंहगड रोड) असे गंभीर जखमी झालेल्याचे महिलेचे नाव आहे. या प्रकरणी कौशल्या यांचा मुलगा कृष्णा (३०) याला अटक करण्यात आली.
याबाबत कृष्णाचा मोठा भाऊ बाबासाहेब (३६) याने पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कृष्णा कांबळे याला दारू पिण्याचे व्यसन आहे. तो काही कामधंदा करत नाही. तो दारू पिण्यासाठी सतत पैशांची मागणी करून आईला त्रास देत होता.
पैसे न दिल्याने त्याने आईला शिवीगाळ केली. गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास त्याने आई कौशल्या यांच्यावर चाकूने वार केले. छातीत चाकूने भोसकले. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पसार झालेल्या कृष्णा याला पोलिसांनी अटक केली. पोलिस उपनिरीक्षक शेख तपास करत आहेत.