स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला समक्ष भेटण्यास परवानगी द्या;आरोपीच्या वकिलाचा न्यायालयात अर्ज
By नम्रता फडणीस | Updated: March 22, 2025 16:01 IST2025-03-22T16:01:13+5:302025-03-22T16:01:59+5:30
- आरोपीच्या वकिलाचा न्यायालयात अर्ज : २४ तारखेला सुनावणी

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला समक्ष भेटण्यास परवानगी द्या;आरोपीच्या वकिलाचा न्यायालयात अर्ज
पुणे :स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याला समक्ष भेटण्यास परवानगी द्यावी, असा अर्ज त्याचे वकील अॅड. वाजीद खान (बिडकर) यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे दाखल केला आहे. यावर सोमवारी (दि.२४) सुनावणी होणार आहे.
स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार केल्याच्या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी गाडे याला अटक केली आहे. तो न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात आहे. तेथे वकिलाला इतर आरोपींप्रमाणे त्याच्याशी फोनवरूनच बोलावे लागते. मात्र, हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. घटनेचे माध्यमांधे उमटलेले पडसाद, फोनवर बोलताना इतर आरोपी, पोलीस उपस्थित असतात. त्यामुळे तो मानसिक विवेचनातून जात आहे. त्यामुळे त्याला प्रत्यक्ष भेटून मुलाखत घेण्यास परवानगी देण्याची मागणी, अॅड. वाजीद खान (बिडकर) यांनी अर्जातून केली आहे.
तत्पूर्वी, स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीला धमकावून गाडे या नराधमाने तिच्यावर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना सकाळी साडेपाचच्या सुमारास घडली होती. गाडे गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याने त्याला पोलिसांच्या कामकाजाबाबत माहिती असल्याने तो पोलिसांना गुंगारा देत असल्याची चर्चा शहरात होती. घटनेनंतर आरोपी शिरुरमध्ये लपून बसल्याची माहिती समोर आली. त्यांनतर त्याचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा, तसेच स्वारगेट पोलिसांनी १३ पथके शिरूरला रवाना झाली. अखेर ७२ तासांच्या कालावधीनंतर गाडेला शोधण्यात यश आले. आता या नराधमावर लवकरात लवकर कारवाई करत कठोर शिक्षा करावी अशी मागणी सर्व स्तरावरून होत होती. पुणे पोलिसांकडून विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्तीची मागणी करण्यात आली होती. अखेर राज्य शासनाकडून या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे.