Video: पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणेचा आरोप; पर्वती पोलिसांकडे तक्रार, कठोर कारवाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 13:39 IST2026-03-08T13:38:21+5:302026-03-08T13:39:14+5:30
पर्वती परिसरातील जनता वसाहत येथे राहणाऱ्या अमन मुल्ला या व्यक्तीने पाकिस्तानचे समर्थन करत घोषणाबाजी केल्याचा आरोप करण्यात आला आहे

Video: पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणेचा आरोप; पर्वती पोलिसांकडे तक्रार, कठोर कारवाईची मागणी
पुणे - पुणे शहरातील पर्वती परिसरात एका व्यक्तीने “पाकिस्तान जिंदाबाद” अशी घोषणा दिल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पर्वती परिसरातील जनता वसाहत येथे राहणाऱ्या अमन मुल्ला या व्यक्तीने पाकिस्तानचे समर्थन करत घोषणाबाजी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून यामुळे सामाजिक वातावरण बिघडू शकते, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात पर्वती पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, भारतात राहून परदेशी राष्ट्राचे उदात्तीकरण करणाऱ्या घोषणांमुळे देशाच्या सार्वभौमत्वाला धक्का पोहोचतो तसेच देशभक्त नागरिकांच्या भावना दुखावल्या जातात, असे सांगण्यात आले आहे.
तक्रारदारांनी असेही म्हटले आहे की, अशा प्रकारच्या घटनांकडे वेळेत लक्ष न दिल्यास भविष्यात सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित व्यक्तीवर कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ही तक्रार सकल हिंदू समाज, पुणे शहर यांच्या वतीने देण्यात आली असून निवेदनावर संबंधित संघटनेच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या आहेत. तसेच पर्वती पोलीस ठाण्याचा अधिकृत शिक्का या निवेदनावर असल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेत चौकशी सुरू करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चौकशीनंतर तथ्य स्पष्ट झाल्यास कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सध्या या घटनेची चर्चा परिसरात सुरू असून नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. सामाजिक सौहार्द टिकवण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचेही स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.