अनियमित पाणीपुरवठ्यामुळे आळंदीकरांची तहान भागेना; उन्हाळ्यामुळे टँकरसाठी मोजावे लागतात हजारो रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 09:34 IST2025-03-25T09:34:28+5:302025-03-25T09:34:49+5:30
वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढत आहे. तर वाढत्या लोकसंख्येमुळे नळजोड कनेक्शनही वाढत चालली आहेत.

अनियमित पाणीपुरवठ्यामुळे आळंदीकरांची तहान भागेना; उन्हाळ्यामुळे टँकरसाठी मोजावे लागतात हजारो रुपये
- भानुदास पऱ्हाड
आळंदी : भामा आसखेड धरणाचे पाणी मिळाले... कोट्यवधी रुपयांची जलवाहिनी केली... जलशुद्धीकरण केंद्र उभारले... जलकुंभ बांधले.... मात्र, ढिसाळ यंत्रणेमुळे तीर्थक्षेत्र आळंदी शहराला अनियमित पाणीपुरवठ्याचे ग्रहण लागले आहे. एकीकडे वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढत आहे. तर वाढत्या लोकसंख्येमुळे नळजोड कनेक्शनही वाढत चालली आहेत. याच थेट परिणाम आळंदीकरांना दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर होऊन तो आता थेट तीन - चार दिवसांवर जाऊ लागला आहे. परिणामी आळंदी शहरातील नागरिकांची तहान भागत नसल्याची सत्यस्थिती आहे. सन २०१९ पासून खेड विभाग व हवेली विभाग असे झोन करत दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला आहे. त्यास आता पाच वर्ष पूर्ण झाली आहेत.
आळंदी हे शहर राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शहरात वास्तव्याला येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तसेच माऊलींच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी नित्याने मोठी भाविकांची गर्दी असते. मात्र आळंदीत पिण्याच्या पाण्याची गहन समस्या निर्माण होत आहे. करोडो रुपये खर्चूनही शहरात दररोज पाणीपुरवठा होत नाही.
सद्यस्थितीत आळंदी शहरातील नागरिकांना दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून यामध्येही सातत्य उरले नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. वास्तविक तीर्थक्षेत्र आळंदीत पिण्याच्या पाण्याची समस्या मागील अनेक वर्ष प्रलंबित आहे. अनियमित पाणीपुरवठा जणू काही आळंदीकरांच्या पाचवीला पूजला की काय? असा प्रश्न उभा राहत आहे. यावर स्थानिक नागरिकांकडून अनेकदा तीव्र प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान आळंदी शहरासाठी भामा - आसखेड धरणातून १० एमएलडी पाणी मंजूर करण्यात आले आहे. त्यासाठी कुरुळी येथून पुण्याला जाणाऱ्या जलवाहिनीला टॅपिंग करत आळंदी शहराकडे करोडो रुपये खर्चून नव्याने जलवाहिनी टाकण्यात आली आहे. पुणे महानगरपालिका यांचे मार्फत मंजूर १० एमएलडी कोठ्यातून सध्या सात एमएलडी पाणी घेतले जात आहे.
आळंदीत पाण्याची जास्त मागणी असतानाही कमी प्रमाणात पाणी उचलले जात आहे. त्यातच उपलब्ध पाणी शुद्धीकरणाला लागणारा वेळ, खंडित वीजपुरवठा, जलवाहिनी फुटणे असे प्रकार झाल्यानंतर दिवसाआड होणारा पाणीपुरवठा पाच - सहा दिवसांवर जात आहे. नगरपरिषदेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा होईलच याचीही शाश्वती नाही. कधीकधी दिलेल्या वेळेपेक्षा चार - पाच तास उशिरानेच पाणी पुरवठा होतो. त्यामुळे महिलांना नळापुढे भांडी घेऊन पाण्याची वाट बघावी लागत आहे. नगरपरिषदेने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे अशी मागणी आळंदी शहरातून होत आहे.
हजारोंचा भुर्दंड वाचविण्याचे नूतन मुख्याधिकाऱ्यांसमोर आव्हान...
दिवसाआड तसेच अनियमित पाणीपुरवठ्यामुळे आळंदी शहरातील नागरिकांना टँकरचे विकत पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी हजारो रुपयांचा भुर्दंड पदरी पडत आहे. नुकताच नवीन मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी नगरपरिषदेचा पदभार स्वीकारला आहे आहे. शहरात नियमित पाणीपुरवठा करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल.
आळंदी शहरातील पिण्याच्या पाण्यासंदर्भात आमदार बाबाजी काळे यांनी नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांसमवेत विशेष बैठक घेतली होती. सद्यस्थितीत आळंदीतील स्थानिक नागरिकांच्या पाण्या संदर्भातील समस्या जाणून घेत नगरपरिषद मार्फत नागरिकांना नियमित वेळेवर पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा सूचना आमदार काळे यांनी संबंधित प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र बैठकीनंतरही अनियमित पाणीपुरवठ्याचे ग्रहण सुटले नाही.
तीन कोटींचा निधी हवा....
शहराला नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी भामा आसखेड धरणातून १० एमएलडी भामा पाणीपुरवठा आवश्यक आहे. शहरात दहा लाख लिटरच्या अजून दोन जलटाक्यांची आवश्यकता आहे. तसेच शहरातील पाणी पुरवठाचा खर्च पाहता ३ कोटी रु. निधीची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत शहरातील गोळा होणाऱ्या पाणीपट्टीच्या तुलनेत पुणे महापालिकेद्वारे पुरवण्यात येणाऱ्या भामा आसखेड योजनेच्या पाणी पुरवठ्यावर अधिक खर्च होत आहे. यामुळे थकबाकी वाढत आहे. परिणामी महापालिकेकडून मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याचे नगरपरिषदेकडून सांगण्यात येत आहे.
'गतवर्षी पाणीपुरवठाचा व्हाॅट्सॲप ग्रुप होता. पाणीपुरवठा कर्मचाऱ्याचे व्हाॅट्सॲप हॅक झाल्यामुळे डिलिट करण्यात आला. तो पुन्हा सुरू करावा. म्हणजे नेमके पाणी कधी येईल? याची माहिती नागरिकांना समजू शकेल. प्रत्येकाकडे पाणी साठवण क्षमता जास्तीची असतेच असे नाही. त्यामुळे दिवसात आड पाणीपुरवठा करावा.' - पूजा कांबळे, नागरिक, आळंदी.
'पाणी येण्याची वेळ निश्चित नसते. कधी पाणी रात्री उशिरा, तर कधी पहाटे सुटते. पाणी भरण्यासाठी जागे राहावे लागते. कधीकधी मंदिरात कीर्तनाला गेल्यानंतर पाणी येऊन जाते. घरी कोणी नसल्यामुळे पाणी भरता येत नाही. नंतर पाच ते सहा दिवस पाण्याची वाट पाहावी लागते. नियमित व निश्चित वेळेला पाणीपुरवठा करण्यात यावा.' - बाळकृष्ण महाराज भोंडोकार, रहिवासी.