Pune Crime : नोकरीच्या शोधात पुण्यात आलेल्या भूतानच्या २७ वर्षीय तरूणीवर ७ जणांकडून अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 13:27 IST2025-04-09T13:27:03+5:302025-04-09T13:27:47+5:30

बलात्कार प्रकरणात वकिलासह सहा आरोपींना अटक

Pune Crime A 27-year-old Bhutanese woman who came to Pune in search of a job was raped by 7 people | Pune Crime : नोकरीच्या शोधात पुण्यात आलेल्या भूतानच्या २७ वर्षीय तरूणीवर ७ जणांकडून अत्याचार

Pune Crime : नोकरीच्या शोधात पुण्यात आलेल्या भूतानच्या २७ वर्षीय तरूणीवर ७ जणांकडून अत्याचार

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता शंतनू कुकडे याला बलात्कार प्रकरणात अटक केली. त्यानंतर पोलिस तपासात वकिलासह सहा जणांचा सहभाग असल्याचे समोर आले असून, त्यांच्यावर समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंदवण्यात आला आहे. दरम्यान, आरोपींना न्यायालयाने दि. १२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

ऋषीकेश गंगाधर नवले (वय ४८), प्रतीक पांडुरंग शिंदे (वय ३६), विपीन चंद्रकांत बिडकर (वय ४८), सागर दशरथ रासगे (वय ३५), अविनाश नोएल सूर्यवंशी (वय ५८) आणि मुद्दसीर इस्माईल मेमन (वय ३८) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात तपास सुरू असताना भूतान येथून आलेल्या अजून एका महिलेवर तीन ते चार जणांनी बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यात अटक आरोपींचा सहभाग तपासात समोर आल्याने आरोपींना अटक करून मंगळवारी (दि. ८) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वानखेडे कोर्टात हजर करण्यात आले.

सरकारी वकील नीलिमा इथापे-यादव यांनी न्यायालयात सांगितले की, पीडित महिला भूतान देशाच्या नागरिक असून, त्या नोकरीच्या शोधात पुण्यात आल्या होत्या. त्या निराधार आणि असहाय असताना आरोपींनी त्यांचा गैरफायदा घेऊन जबरदस्तीने त्यांच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध केले. पीडितेने आरोपींच्या नावानिशी तक्रार दिली आहे. आरोपी हे एकमेकांचे मित्र असून, त्यांना गुन्हा करण्यास कुणी प्रवृत्त केले? तसेच दाखल गुन्ह्यात त्यांचे इतर कुणी साथीदार आहेत का? याचा तपास करायचा आहे. या अनुषंगाने आरोपींची वैद्यकीय चाचणी करायची आहे, त्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी त्यांनी केली. न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली.

Web Title: Pune Crime A 27-year-old Bhutanese woman who came to Pune in search of a job was raped by 7 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.