भांगयुक्त बंटा गोळ्यांची २४ पाकिटे जप्त; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई  

By नितीश गोवंडे | Updated: March 21, 2025 18:09 IST2025-03-21T18:08:06+5:302025-03-21T18:09:07+5:30

शहरामध्ये भांगयुक्त बंटा गोळ्यांची विक्री होत असल्याबाबतची पोलिसांना माहिती मिळाली होती

pune crime 24 packets of cannabis-infused Banta pills seized; Anti-Narcotics Squad takes action | भांगयुक्त बंटा गोळ्यांची २४ पाकिटे जप्त; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई  

भांगयुक्त बंटा गोळ्यांची २४ पाकिटे जप्त; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई  

पुणे : शहरामध्ये भांगयुक्त बंटा गोळ्यांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावरून गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अनेक ठिकाणी छापेमारी करुन एका किराणा दुकानदाराला पकडले. दिनेश मोहनलाल चौधरी (३०, रा. राधाकृष्ण अपार्टमेंट, देशमुखवाडी, शिवणे) असे या किराणा दुकानदाराचे नाव आहे. त्याकडे नायलॉन पोत्यामध्ये भांगयुक्त बंट्याच्या गोळ्या असलेली एकूण २४ पॅकेट मिळाली. प्रत्येक पाकिटाचे वजन २०० ग्रॅम असा एकूण १० हजार ८०० रुपयांचा ४ किलो ८०० ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहेत.

शहरामध्ये भांगयुक्त बंटा गोळ्यांची विक्री होत असल्याबाबतची पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी शहरातील अनेक पानटपऱ्यांमध्ये तपासणी केली. त्यातून पोलिसांना माहिती मिळाली. पोलिस अशा भांगयुक्त बंटा गोळ्यांची विक्री करणाऱ्याचा शोध घेत असताना शिवणे येथील कॅनॉल रोडला साई सृष्टी रेसिडेन्सी समोरील रोडवर दिनेश चौधरी हा जाताना दिसला. पोलिसांनी त्याला पकडले असता त्याच्याकडील पोत्यात भांगयुक्त बंटा गोळ्यांची पाकिटे मिळाली.

दिनेश चौधरी हा मूळचा राजस्थानचा असून गेल्या ४ ते ५ वर्षांपासून पुण्यात आला असून त्याचे किराणा दुकान आहे. त्याने या भांगयुक्त बंटा गोळ्या कोठून आणल्या व कुठे विक्री करत होता, याचा पोलिस तपास करत आहेत.

ही कारवाई अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे, उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलिस अंमलदार सचिन माळवे, संदीप शिर्के, विपुन गायकवाड, विशाल दळवी, मारुती पारधी, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे.

Web Title: pune crime 24 packets of cannabis-infused Banta pills seized; Anti-Narcotics Squad takes action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.