नारायण राणेंवर टीका करणाऱ्या भास्कर जाधव यांना पुणे न्यायालयाचा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 12:42 IST2022-10-25T12:42:12+5:302022-10-25T12:42:25+5:30

हंगामी अटकपूर्व जामीन मंजूर

Pune Court gives relief to Bhaskar Jadhav who criticized Narayan Rane | नारायण राणेंवर टीका करणाऱ्या भास्कर जाधव यांना पुणे न्यायालयाचा दिलासा

नारायण राणेंवर टीका करणाऱ्या भास्कर जाधव यांना पुणे न्यायालयाचा दिलासा

पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र माजी खासदार नीलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांच्यावर वादग्रस्त शब्दांत टीका करून राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना पुणेन्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला. सत्र न्यायाधीश जी. ए. रामटेके यांनी हा आदेश दिला.

कुडाळ येथील आमदार वैभव नाईक यांच्या बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी सुरू केली. त्याच्या निषेधार्थ सिंधुदुर्गात काढलेल्या मोर्चात आमदार भास्कर जाधव यांनी भाषण करताना नारायण राणे व त्यांच्या दोन्ही पुत्रांवर वादग्रस्त शब्दांत टीका केली होती. त्यावर पुण्यातील भाजप कार्यकर्त्याने भास्कर जाधव यांच्याविरोधात प्रक्षोभक वक्तव्ये करून राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सामाजिक तेढ निर्माण करून त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण करण्यास चिथावणी दिल्याची फिर्याद डेक्कन पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार आमदार भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी भास्कर जाधव यांनी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. ॲड. विजयसिंह ठोंबरे, ॲड. हितेश सोनार व ॲड. संदीप जाधव यांनी भास्कर जाधव यांची बाजू मांडली. भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबीयांवर वैयक्तिक टीका केली असून, कोणताही समाज, जात, धर्माविरोधात टीका केलेली नाही. केवळ भास्कर जाधव यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर खोटी कलमे लावून राजकीय दबावातून खोटा गुन्हा दाखल केला जात आहे, असा युक्तिवाद जाधव यांच्या वतीने ॲड. ठोंबरे यांनी केला. बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने भास्कर जाधव यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला.

Web Title: Pune Court gives relief to Bhaskar Jadhav who criticized Narayan Rane