शिक्षण सेवकाकडे पावणेतीन लाखांची लाच घेणाऱ्या जिल्हा परिषदेतील प्रशासन अधिकाऱ्यासह दोघे ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 19:20 IST2026-04-07T19:18:24+5:302026-04-07T19:20:35+5:30

pune bribe case - भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये वानवडी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले.

pune bribe case Two arrested, including an administrative officer of the Zilla Parishad, for taking a bribe of Rs. 3.5 lakh from an education worker | शिक्षण सेवकाकडे पावणेतीन लाखांची लाच घेणाऱ्या जिल्हा परिषदेतील प्रशासन अधिकाऱ्यासह दोघे ताब्यात

शिक्षण सेवकाकडे पावणेतीन लाखांची लाच घेणाऱ्या जिल्हा परिषदेतील प्रशासन अधिकाऱ्यासह दोघे ताब्यात

पुणे : पदोन्नतीसाठी शिक्षण सेवकाकडून पावणेतीन लाख रुपयांची लाच घेणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सहायक प्रशासन अधिकाऱ्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये वानवडी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले.

याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सहायक प्रशासन अधिकारी राजेश श्रीराम खंदारे (वय ५२), कनिष्ठ सहायक अनिल पोपट रंधवे (३२), आतिश कैरू शिंदे (४०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या बाबत एका शिक्षण सेवकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. उपशिक्षकपदी पदोन्नतीसाठी गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती वेल्हे यांच्यामार्फत त्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठविला होता. शिक्षण विभागातील सहायक प्रशासन अधिकारी खंदारे यांची त्यांनी भेट घेतली. जातवैधता प्रमाणपत्र नसले तरी अनुकूल प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवितो, असे सांगून खंदारे यांनी त्यांच्याकडे तीन लाख रुपयांची लाच मागितली.

त्यानंतर खंदारे, रंधवे, शिंदे यांनी लाचेचा पहिला हप्ता म्हणून तक्रारदाराकडून २५ हजार घेतले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर तक्रारीची पडताळणी करण्यात आली. उर्वरित पावणेतीन लाख रुपये घेऊन तक्रारदाराला घोरपडीतील बी.टी. कवडे रस्त्यावरील एका माॅलसमोर बोलावण्यात आले. सोमवारी (दि. ६) सापळा लावून तक्रारदाराकडून लाच घेणाऱ्या रंधवे आणि शिंदे यांना पकडण्यात आले. त्यानंतर खंदारे, रंधवे आणि शिंदे यांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरा वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्य मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांनी ही कारवाई केली. सहायक आयुक्त नीता मिसाळ या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title : पुणे: पदोन्नति के लिए रिश्वत लेते अधिकारी गिरफ्तार

Web Summary : पुणे में जिला परिषद के एक अधिकारी सहित कई लोगों को एक शिक्षक से पदोन्नति के लिए 3.25 लाख रुपये की रिश्वत लेते हुए गिरफ्तार किया गया। भ्रष्टाचार निरोधक ब्यूरो ने दो लोगों को रंगे हाथों पकड़ा, जिसके बाद कुल तीन गिरफ्तार हुए। वानवडी पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया है।

Web Title : Pune: Officials Arrested for Accepting Bribe for Promotion

Web Summary : Pune officials, including a district council officer, were arrested for accepting a bribe of ₹3.25 lakhs from a teacher seeking promotion. The Anti-Corruption Bureau caught two individuals red-handed accepting the money, leading to the arrest of three in total. A case has been registered at Wanwadi police station.