Pune Airport : विस्कळीत विमानसेवेमुळे तिकीट दर भिडले गगनाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 20:08 IST2025-12-05T20:07:17+5:302025-12-05T20:08:47+5:30
- शुक्रवारी इंडिगोचे ४२ उड्डाणे रद्द; प्रवाशांना दुहेरी मनस्ताप

Pune Airport : विस्कळीत विमानसेवेमुळे तिकीट दर भिडले गगनाला
- अंबादास गवंडी
पुणे : गेल्या चार ते पाच दिवसांपासून इंडिगो विमान कंपनीची सेवा विस्कळीत झाली आहे. त्याचा गैरफायदा इतर विमान कंपन्या घेत आहे. उर्वरित वेळी आठ ते १० हजार रुपये तिकीट असणाऱ्या दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू या शहरासाठी २० ते ३० हजार रुपये तिकीट दर आकारले जात आहे. शिवाय विमानतळाजवळील हाॅटेलचे दरही वाढले आहेत. शुक्रवारी इंडिगोच्या पुण्यात येणाऱ्या २१ आणि जाणाऱ्या २१ असे ४२ उड्डाणे रद्द झाल्या. शिवाय तिकिटासाठी जादा पैसे मोजूनही विमानासाठी तासन् तास वाट पाहण्याची वेळ प्रवाशांवर आली. यामुळे विमान प्रवाशांना दुहेरी मनस्ताप सहन करावा लागला.
डीजीसीएकडून विमान कर्मचाऱ्यांच्या वेळेत केलेल्या बदलामुळे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून विमानांच्या वेळापत्रकात मोठा व्यत्यय निर्माण झाला आहे. त्याचा सर्वात मोठा फटका इंडिगोच्या उड्डाणांवर झाला आहे. त्यामुळे विमानांना विलंब आणि रद्द होण्याच्या घटनांमुळे प्रवाशांना गंभीर गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. शुक्रवारी (दि. ५) रोजी रात्री बारा ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ३२ विमाने रद्द करण्यात आले. तर काही विलंबाने सोडण्यात उड्डाण केले. शिवाय प्रवाशांना लगेच वेळत न मिळाल्याने दोन ते तीन तास शोधावे लागले. प्रवाशांच्या या तुटवड्यामुळे विमान प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
लगेज घेण्यासाठी तीन तास
प्रवाशांना विमानासाठी आठ ते दहा तास थांबल्यानंतर विमान रद्द झाल्याचे समजल्यानंतर चिडचिड झाली होती. त्यानंतर प्रवासी त्यांचे लगेज घेण्यासाठी गेल्यानंतर विमान कंपनीने प्रवाशांची लगेज टाकून दिली होती. त्यामुळे लगेज शोधण्यासाठी प्रवाशांना दोन ते चार तास फिरावे लागत होते. यामध्ये प्रवाशांची प्रचंड चिडचिड झाली. काही प्रवाशांना आपत्कालीन स्थितीमुळे घरी जायचे होते; पण विमान रद्द झाल्यामुळे त्यांना काय करावे, हे सुचत नव्हते, अशी माहिती प्रवाशांनी दिली.
इंडिगोच्या गोंधळाचा गैरफायदा घेत काही विमान कंपन्या, विमानतळाजवळील हॉटेल्स भाड्यात अवाजवी वाढ करून प्रवाशांचे शोषण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, ही अत्यंत निंदनीय बाब आहे. अडचणीच्या वेळी सेवा पुरवणाऱ्या एअरलाइन व हॉटेल्सने सहकार्याची भूमिका बजावणे अपेक्षित असताना नफा कमावणे असंवेदनशील आणि अनैतिक आहे. सरकारने केवळ प्रवाशांनी आवाज उठवल्यानंतर हस्तक्षेप करण्यापेक्षा, तत्काळ आणि सक्रिय पावले उचलून दर वाढ होऊ नये, यासाठी अंकुश ठेवणे अत्यावश्यक आहे. -धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूकतज्ज्ञ
इंडिगो विमानाने दिल्लीला निघालो होतो. एेनवेळी विमान रद्द झाल्याचे सांगण्यात आले. तोपर्यंत लगेच पाठविले होते. विमान रद्द झाल्यावर लगेज शोधण्यासाठी तीन तास लागले. माझे वय आता ८० वर्षे आहे. त्यामुळे प्रचंड गैरसोय झाला. शेवटी लगेज घेऊन परत घरी आलो. इंडिगोने प्रवाशांना वेठीस धरले. -कर्नल (निवृत्त) शिशिकांत दळवी
विमानतळावरील सर्व सेवा टर्मिनल व्यवस्थापन, सुरक्षा कर्मचारी, ग्राउंड हँडलिंग एजन्सी आणि विमान कंपन्यांचे पथक पूर्ण क्षमतेने तैनात राहून प्रवाशांची गर्दी नीट हाताळत आहेत. एप्रन वापरावर सतत लक्ष ठेवून उड्डाणांच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ नये, याची दक्षताही घेतली जात आहे. -संतोष ढोके, विमानतळ संचालक
इंडिगोच्या सेवेत झालेलेल्या अडचणींमुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. डीजीसीएच्या (एफडीटीएल) आदेशांना तत्काळ स्थगिती देण्यात आली असून, प्रवासी हित लक्षात घेऊन आणि विमान सुरक्षेत कोणतीही तडजोड न करता हे निर्णय घेण्यात आले आहेत. केंद्र सरकारने या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला विश्वास आहे की, पुढील एक-दोन दिवसांत विमानसेवा स्थिर होतील. -मुरलीधर मोहोळ, केंद्रीय हवाई नागरी राज्यमंत्री