Pune Airport : दिवसभरात ‘इंडिगो’च्या २१ विमान उड्डाणांना ‘लेटमार्क’
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 10:59 IST2025-11-28T10:58:48+5:302025-11-28T10:59:03+5:30
इतर कंपन्यांच्या २० हून अधिक विमानांना अर्ध्या तासापासून तीन तासांपर्यंत उशीर झाला. त्याचा फटका विमान प्रवाशांना सहन करावा लागला.

Pune Airport : दिवसभरात ‘इंडिगो’च्या २१ विमान उड्डाणांना ‘लेटमार्क’
पुणे : पुण्यात येणाऱ्या इंडिगो एअरलाइन्ससह इतर कंपन्यांच्या विमानांचे वेळापत्रक गुरुवारी बिघडल्याचे दिसून आले. यामुळे पुणे विमानतळावरून जयपूर, नागपूर, वाराणसी, कोलकाता, चेन्नई, भोपाळ, बंगळुरू, दिल्ली यांसह इतर शहराला उड्डाण करणाऱ्या इंडिगोच्या २१ विमानांना उशीर झाला. शिवाय इतर कंपन्यांच्या २० हून अधिक विमानांना अर्ध्या तासापासून तीन तासांपर्यंत उशीर झाला. त्याचा फटका विमान प्रवाशांना सहन करावा लागला.
लोहगाव विमानतळावरून विमान उड्डाणांची संख्या वाढविण्यात आली आहे. परंतु विमान कंपन्यांकडून कनेक्टिंग उड्डाणांचे वेळापत्रक गुरुवारी बिघडल्याचे दिसून आले. शिवाय इतर कंपन्यांच्या २० हून अधिक विमानांना उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांना विमानतळावर तासन् तास ताटकळत बसावे लागत आहे. पुण्यातून सध्या ३२ ते ३३ हजार प्रवासी दैनंदिन प्रवास करत आहेत. मात्र, बुधवारी रात्रीपासूनच पुण्यातून उड्डाण करणाऱ्या विमानांना एक ते दोन तास उशीर झाल्याचे दिसून आले.
मध्यरात्री १२ ते सकाळी सहा दरम्यान बंगळुरू, चेन्नई, कोचिन, नागपूर, दिल्ली, अमृतसर, कोलकाता येथून येणाऱ्या १२ विमानांना पुण्यात येण्यास उशीर झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ही विमाने पुण्यातून उड्डाण करतानादेखील एक ते दोन तास उशिराने गेली.
सकाळी सहापासून ते सायंकाळी सहापर्यंत १७ विमानांना पुण्यात येण्यास उशीर झाला. विमान उड्डाणांना होणाऱ्या अवाजवी विलंबामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. उड्डाणांचे बिघडणारे नियोजन आणि मानसिक-शारीरिक थकवा यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप होऊन गैरसोय होते. टर्मिनलमध्ये वाढलेली गर्दी, सुरक्षा रांगा, प्रस्थान-आगमन क्षेत्रातील ताण, पार्किंग-बे अलॉटमेंटवर ताण यांसारखे प्रश्न निर्माण झाले.
अशी आहे आकडेवारी :
पुण्यात येणाऱ्या विमाने - १००
पुण्यातून जाणाऱ्या विमाने - १००
दिवसभरात उशीर झालेल्या विमाने - ४०
उड्डाणांना होणारा आवाजवी विलंब यांचा प्रवाशांच्या हक्कांशी आणि विमानतळांच्या कार्यक्षमतेशी थेट संबंध असल्यामुळे आता याकडे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने अत्यंत गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे. वेळेवर उड्डाणे करणे ही केवळ एअरलाईन्सची व्यावसायिक जबाबदारी नसून प्रवाशांचा मूलभूत हक्क आहे. म्हणूनच, उड्डाणे काही अपवादात्मक कारणे सोडल्यास, वेळेवर न झाल्यास प्रवाशांना त्याची नुकसानभरपाई मिळणे अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर, मी केंद्र सरकार आणि केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाला अपील करतो की उड्डाणांच्या अवाजवी विलंबासाठी एअरलाइन्सनी प्रवाशांना भरपाई देणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक करावे. - धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूकतज्ज्ञ
पुण्यात येणाऱ्या विविध कंपन्यांच्या विमानांना उशीर होत आहे. त्यामुळे पुण्यातून होणाऱ्या उड्डाणास विमानांना विलंब होत आहे. - संतोष ढोके, संचालक, लोहगाव विमानतळ