पुणे : अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर एकीकडे डीजीसीएने सुरक्षेसाठी अधिक काळजी घेण्याची सूचना देशातील विमानतळ प्रशासनाला दिला आहे, दुसरीकडे पुणेविमानतळावर मोकाट कुत्रे, बिबट्या अन् पक्ष्यांचा अलीकडे वावर वाढला आहे. याकडे विमानतळ प्रशासन, लोकप्रतिनिधी याचे दुर्लक्ष होत असून, पुणे विमानतळावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एखादी दुर्घटना घडल्यावरच विमानतळ प्रशासन आणि लोकप्रतिनिधी खडबडून जागे होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुणे विमानतळावर नवीन टर्मिनल सुरू झाल्यावर प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. परंतु, अलीकडच्या काळात विमानतळ परिसरात पक्षी घिरट्या घालणे, बिबट्याची वावर, रन-वेवर कुत्रा येणे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. याचा परिणाम विमानसेवेबरोबर प्रवाशांवर होत आहेच, शिवाय सुरक्षेचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या तीन महिन्यांत जवळपास चार ते पाच घटना घडल्या आहेत. सुदैवाने या घटनांमुळे कोणताही अनर्थ घडला नाही.विमान उड्डाणासाठी धावपट्टी व परिसर पक्षी व वन्यजीवांपासून मुक्त, सुरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. लोहगाव विमानतळावरील धावपट्टीचे व्यवस्थापन भारतीय हवाई दलाकडे असल्यामुळे केंद्रीय संरक्षण मंत्रालय व नागरी टर्मिनल व्यवस्थापन एअरपोर्ट ॲथोरिटी ऑफ इंडियाकडे असल्यामुळे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालय यांच्याकडे प्रामुख्याने लोहगाव विमानतळावरील नागरी उड्डाणांच्या सुरक्षित संचालनाची जबाबदारी आहे. त्यांनी सतत घडणाऱ्या अशा गंभीर घटनांचा पुणे मनपाबरोबर संयुक्त आढावा घेऊन अशा घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी कठोर आणि कालमर्यादित उपाययोजना राबविण्याची तातडीची आवश्यकता आहे.
अशा आहेत घटनाक्रम :घटना पहिली - (दि. २८) एप्रिल, २०२५ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास धावपट्टीवर बिबट्याचे दर्शन झाले. यामुळे विमानतळ अधिकारी, सुरक्षा कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटना दुसरी - (दि. २०) मे, २०२५ रोजी विमानतळाच्या धावपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात पक्षी असल्याने नियोजित उड्डाणांना तीन तास विलंब झाला होता.घटना तिसरी - (दि. २०) जून २०२५ दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला पक्ष्याची धडक बसल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे दिल्लीला जाणाऱ्या या विमानाची सुरक्षेच्या कारणास्तव उड्डाण रद्द करण्यात आले होते.
घटना चाैथी - (दि. २८) जून २०२५पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर कुत्रा आल्याने भुवनेश्वर-पुणे हे विमान अर्धा तास हवेत घिरट्या घालत होते.
पर्यावरण समिती गेली कुठे?-विमानतळाच्या सुरक्षित पर्यावरणासाठी, ध्वनी आणि प्रदूषणावर नियंत्रण आणि सुरक्षेसाठी विमानतळ पर्यावरण समिती कार्य करत असते. यामध्ये महापालिका, जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असतो. जिल्हाधिकारी या समितीचे प्रमुख असतात, परंतु गेल्या तीन महिन्यांपासून प्राणी, पक्षी विमानतळाच्या धावपट्टी परिसरात येण्याचे प्रमाण वाढत आहे. तरीही याकडे पर्यावरण समिती दुर्लक्ष करत असून, संबंधित समितीतील अधिकारी नेमके काय करीत आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
विमानतळावरील आकडेवारी :पुण्यात येणाऱ्या विमानांची संख्या (सरासरी) - १०२पुण्यातून जाणाऱ्या विमानांची संख्या (सरासरी) - १०२विमानतळावरील दैनंदिन प्रवासी संख्या - ३३ ते ३५ हजार
गेल्या काही दिवसांत पक्षी धडकल्याची घटना, बिबट्याचा वावर, या व अशा इतर घटना या नागरी व वायुदल विमान संचालन सुरक्षेसाठी अत्यंत गंभीर बाबी आहेत. परंतु वारंवार घडत असलेल्या अशा घटना विमानतळाच्या सुरक्षित पर्यावरणासाठी आवश्यक असलेले समन्वयन व व्यवस्थापनातील त्रुटी निर्देशित करणाऱ्या असून, त्याकडे विमान संचालन सुरक्षेबाबत मिळत असलेले अत्यंत गंभीर संकेत म्हणून संबंधितांनी पाहणे अत्यंत गरजेचे आहे. सतत घडणाऱ्या अशा गंभीर घटनांचा पुणे मनपाबरोबर संयुक्त आढावा घेऊन भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी कठोर उपाययोजना राबविण्याची आवश्यकता आहे. -धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ