भक्तांचा होणार सुखद अन् सोयीस्कर प्रवास; गणेशोत्सवात पुणे ते सिंधुदुर्ग जादा उड्डाणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 20:02 IST2025-08-19T20:01:37+5:302025-08-19T20:02:06+5:30
कोकणातील गणपती उत्सव प्रसिद्ध आहे. पुण्यात कामानिमित्त स्थायिक असलेल्या अनेक कोकणवासीय गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मूळ गावी जातात.

भक्तांचा होणार सुखद अन् सोयीस्कर प्रवास; गणेशोत्सवात पुणे ते सिंधुदुर्ग जादा उड्डाणे
पुणे : गणेशाेत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते. त्यामुळे एसटी, रेल्वे विभागाकडून जादा बस, एसटी गाड्यांची सोय करण्यात येते. आता विमान कंपनीकडून पुण्यातून सिंधुदुर्गला गणेशोत्सवात पाच दिवस जादा विमानसेवा चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा फायदा गणेश भक्तांना होणार असून, फ्लाय ९१ विमान कंपनीकडून पुणे-सिंधुदुर्ग-पुणे अशी जादा उड्डाणे होणार आहेत, अशी माहिती फ्लाय ९१ चे व्यवस्थापकीय संचालक मनोज चाको यांनी दिली.
कोकणातील गणपती उत्सव प्रसिद्ध आहे. पुण्यात कामानिमित्त स्थायिक असलेल्या अनेक कोकणवासीय गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मूळ गावी जातात. त्यामुळे प्रत्येक वर्षी एसटी महामंडळाकडून हजारो जादा लालपरी आणि रेल्वे प्रशासनाकडून विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येतात. यंदाही जादा बस व विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचे नियोजन केले असून, त्याचे बुकिंगदेखील फुल्ल झाले आहेत. लोहगाव विमानतळ येथून सिंधुदुर्गसाठी थेट विमानसेवा आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दोन दिवस अगोदर गावी जाण्यासाठी तसेच परत येण्याची सोय होण्यासाठी त्यामुळे फ्लाय ९१ विमान कंपनीने पुणे ते सिंधुदुर्ग मार्गावर दि. २४, २९, ३१ ऑगस्ट आणि ५ व ७ सप्टेंबर रोजी अतिरिक्त उड्डाणे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवाची सुरुवात २७ ऑगस्ट रोजी होणार असून, भक्तांना बाप्पांचे दर्शन घेताना सुखद आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळावा म्हणून कंपनीने उड्डाणांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा गणेश भक्तांना होणार आहे.