Pune Accident : 'सिग्नल सुटला अन्...' भीषण अपघातात मुलासमोर आईचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 10:20 IST2026-02-06T10:20:00+5:302026-02-06T10:20:30+5:30
सकाळी सुमारे सव्वाआठच्या सुमारास गांधी भवन चौकातील जलसा हॉटेलसमोर सिग्नल सुटला होता.

Pune Accident : 'सिग्नल सुटला अन्...' भीषण अपघातात मुलासमोर आईचा मृत्यू
पुणे : चप्पल दुरुस्ती व विक्रीचा व्यवसाय करून संसार चालवणाऱ्या एका मुलाच्या डोळ्यांसमोर त्याची आई कायमची निघून गेल्याची दुर्दैवी घटना कर्वे रोडवर घडली आहे. एका अनोळखी दुचाकीस्वाराच्या निष्काळजीपणे घेतलेल्या वळणामुळे झालेल्या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलरचे चाक छातीवरून गेल्याने वृद्ध आईचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सीताबाई आजिनाथ शिंदे (६१, रा. संभाजीनगर झोपडपट्टी, कर्वेनगर) असे मयत ज्येष्ठ महिलेचे नाव आहे.
तुळशीदास अजिनाथ शिंदे (३८ , रा. संभाजीनगर झोपडपट्टी, कर्वेनगर) हे चप्पल दुरुस्ती व विक्रीचा व्यवसाय करतात. ते गेली दहा वर्षे आई सीताबाई शिंदे यांच्यासोबत राहतात. आईच त्यांचा एकमेव आधार होती. मंगळवारी सकाळी स्वतःची वैद्यकीय तपासणी असल्याने ते आईला सोबत घेऊन दुचावरून कर्वे रोडने जात होते. सकाळी सुमारे सव्वाआठच्या सुमारास गांधी भवन चौकातील जलसा हॉटेलसमोर सिग्नल सुटला होता. वाहने पुढे सरकत असताना एका रिक्षामागून आलेल्या अनोळखी दुचाकीस्वाराने अचानक उजवीकडे वळण्याचा प्रयत्न केला. त्याचा धक्का शिंदे यांच्या दुचाकीला लागला.
धक्क्यामुळे गाडी घसरून उजवीकडे पडली. त्या क्षणी शेजारून जात असलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरच्या मागील डाव्या चाकाखाली सीताबाई शिंदे आल्या. मुलाने तत्काळ आईला रुग्णालयात नेले. प्राथमिक उपचारानंतर ससून रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्यांना मृत घोषित केले. धक्का देणारा दुचाकीस्वार मात्र घटनास्थळावरून पसार झाला. आईच्या मृत्यूनंतर अंत्यविधी उरकून तुळशीदास शिंदे यांनी अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.