वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 21:36 IST2025-11-13T21:33:29+5:302025-11-13T21:36:26+5:30
आठ जणांचा जागीच मृत्यू; २२ जण जखमी, आठ वाहनांचा चुराडा, महामार्ग ठप्प;राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
- पांडुरंग मरगजे
धनकवडी :पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुल परिसरातील अपघातांची मालिका सुरूच आहे. नवले पुलावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रकने अनेक वाहनांना धडक दिली आणि त्यानंतर आग लागली. या घटनेत ९ जणांचा अक्षरशः होरपळून मृत्यू झाला असून, २२ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुणे–बंगळुरू महामार्गावर नवले पुलाजवळ गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. ब्रेक निकामी झालेल्या भरधाव कंटेनरचे नियंत्रण सुटल्याने समोरून जाणाऱ्या आठ ते दहा वाहनांना त्याने धडक दिली. धडकेनंतर वाहनांना आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारा कंटेनर नवीन कात्रज बोगद्याच्या तीव्र उतारावरून येत असताना अचानक नियंत्रणाबाहेर गेला. वेग प्रचंड असल्याने कंटेनरने समोरील मोटारीला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर मोटार समोरच्या ट्रकमध्ये अडकली आणि क्षणातच दोन्ही वाहनांना आग लागली. काही क्षणांतच ज्वाळांनी रौद्ररूप धारण केले आणि कारमधील प्रवाशांसह कंटेनरचा क्लिनर व इतर जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, हाती मिळालेल्या माहितीनुसार ९ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
अपघातानंतर परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. घटनास्थळी पुणे पोलिस, पीएमआरडीए व पुणे महापालिकेचे अग्निशामक दल दाखल झाले. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान, जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, “प्राथमिक माहितीनुसार या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला असून, घटनास्थळाचा पंचनामा सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण आणि जबाबदार कोण हे शोधण्याचा तपास सुरू आहे.”
वाहतूक ठप्प; वाहनांच्या लांबच लांब रांगा
या अपघातामुळे पुणे–बंगळुरू महामार्गावरील साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने हटविण्याचे व परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले; मात्र दरम्यान वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
दोन कंटेनरमध्ये कार सापडल्याने तिचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. “वाचवा, वाचवा!” अशी मदतीसाठी ट्रक क्लिनरची आर्त हाक ऐकू आली, परंतु आगीच्या तीव्रतेमुळे कोणीच पुढे सरसावले नाही. अपघातानंतर मोठा आवाज झाला. त्यानंतर आसपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, “स्फोटाचा आवाज ऐकून आम्ही अपघातस्थळी धावलो. आम्ही पोहोचलो तेव्हा कारला आग लागलेली होती. ट्रकमध्ये अडकलेला एक जण मदतीसाठी ओरडत होता. बहुधा तो क्लिनर असावा. ‘बाहेर काढा, बाहेर काढा!’ असा त्याचा आक्रोश चालू होता. पण आगीची तीव्रता पाहता स्फोट होण्याची भीती होती, त्यामुळे कोणीही पुढे गेलं नाही.”
कात्रज–नवीन बोगदा ते नवले पूल या दरम्यान सातत्याने घडणाऱ्या अपघातांबाबत आम्ही केंद्र सरकारकडे सातत्याने मागणी करत आहोत. नवीन बोगद्यापासून नवले पुलापर्यंतचा रस्ता लांब असून अति उतार आहे. त्यामुळे मोठ्या आणि अवजड वाहनांची गती वाढते. अशा परिस्थितीत ब्रेक फेल झाल्यास भीषण अपघात होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे या रस्त्याचे रोड इंजिनिअरिंग तपासून आवश्यक बदल करण्याची मागणी आम्ही अनेक वर्षांपासून करीत आहोत.
परंतु या विषयाकडे आतापर्यंत गांभीर्याने पाहिले गेलेले नाही. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीत जिल्ह्यातील वाहतूकदार संस्था प्रतिनिधी आणि वाहतूक तज्ञ यांचा समावेश करून त्यांना अशा समस्यांवर मत मांडण्याची संधी मिळायला हवी. सध्या या समितीत केवळ प्रशासकीय अधिकारी आणि खासदार यांचा समावेश असतो. सरकारी अधिकारी दोन–तीन वर्षांनंतर बदली होतात; तोपर्यंत त्यांना विषयाचे बारकावे कळतही नाहीत. त्यामुळे या समितीत वाहतूक संघटनेचे ज्ञान असलेले प्रतिनिधी व तज्ञ असणे अत्यावश्यक आहे. – डॉ. बाबा शिंदे, राज्य अध्यक्ष, माल व प्रवासी वाहतूक संघटना