Accident : पिंपरी पेंढार येथे भीषण अपघात; ओतूरच्या तरुणाचा जागीच मृत्यू, चालक फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 12:41 IST2026-03-18T12:38:10+5:302026-03-18T12:41:35+5:30
अपघातानंतर पिकअप चालकाने वाहन सोडून घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

Accident : पिंपरी पेंढार येथे भीषण अपघात; ओतूरच्या तरुणाचा जागीच मृत्यू, चालक फरार
जुन्नर (पुणे जि .) : कल्याण–अहिल्यानगर महामार्गावर पिंपरी पेंढार गावाच्या हद्दीत बुधवारी (दि. १८) पहाटे झालेल्या भीषण अपघातात ओतूर येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. पिकअप आणि स्विफ्ट कार यांच्यात झालेल्या समोरासमोरच्या जोरदार धडकेत ही दुर्घटना घडली असून अपघातानंतर पिकअप चालक फरार झाल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास ओतूरकडून आळेफाटाकडे जाणारी पिकअप (एमएच १४ एचजी ५६८६) आणि आळेफाटाकडून ओतूरकडे येणारी स्विफ्ट कार (एमएच १४ जीवाय २१३५) यांच्यात पिंपरी पेंढार परिसरात समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की स्विफ्ट कारचा पुढील भाग पूर्णतः चक्काचूर झाला. या अपघातात स्विफ्ट कार चालक अनिकेत (मयूर) नामदेव पानसरे (रा. ओतूर, ता. जुन्नर) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पिकअप चालकाने वाहन सोडून घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
पोलिसांची तत्काळ कारवाई
घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने पुढील तपास सुरू केला आहे. फरार चालकाचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.
वाहतुकीवर परिणाम, सुरक्षिततेची मागणी
या भीषण अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी या महामार्गावर वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वेगमर्यादा कडक करणे आणि सुरक्षा उपाययोजना वाढवण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे ओतूर आणि माळशेज पट्ट्यात हळहळ व्यक्त होत असून तरुणाच्या अकाली मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.