अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 20:54 IST2025-11-13T20:54:08+5:302025-11-13T20:54:59+5:30
नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. गेल्या आठ वर्षांत या परिसरात २१० हून अधिक अपघात झाले असून, ८२ निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे.

अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
पुणे - नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. गेल्या आठ वर्षांत या परिसरात २१० हून अधिक अपघात झाले असून, ८२ निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. यामध्ये प्रवाशांसह काही स्थानिक नागरिकही मृत्युमुखी पडले आहेत. यावर प्रशासनाने तात्पुरत्या उपाययोजना केल्या; मात्र ठोस उपाययोजना करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत.
वडगाव बुद्रुक, नऱ्हे गावाच्या हद्दीतून जाणारा राष्ट्रीय महामार्ग जांभूळवाडी बोगद्यामार्गे मुंबई–बंगळुरू असा आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून शेकडो लोकांचे बळी नवले पूल, कात्रज रस्ता आणि नऱ्हे येथील महामार्गावर गेलेले आहेत. गेल्या काही वर्षांत या परिसरात मोठ्या अपघातांचे सत्र सुरू असून, असंख्य निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत.
महामार्गावर अपघात घडला की, अनेकवेळा वाहनचालकांची चूक, ब्रेक फेल होणे किंवा अवजड वाहनांवरील नियंत्रण सुटणे अशी कारणे समोर येतात. मात्र या अपघातांचे प्रमुख कारण म्हणजे या परिसरातील तीव्र उतार. तो उतार कमी करणे हाच त्यावरचा पर्याय आहे किंवा लवकरात लवकर रिंगरोड तयार करून अवजड वाहनांची वाहतूक बाहेरून करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
पुण्यातील नवले पुलावर झालेल्या अपघातात काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 13, 2025
या घटनेत प्राण गमावलेल्या व्यक्तींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये…
मुख्यमंत्र्यांची मदतीची घोषणा
दरम्यान, पुण्यातील अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतीची घोषणा केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' पोस्ट करुन त्यांनी घोषणा केली. "पुण्यातील नवले पुलावर झालेल्या अपघातात काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या घटनेत प्राण गमावलेल्या व्यक्तींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येईल", असंही ट्विटमध्ये फडणवीस म्हणाले.