कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 21:21 IST2025-11-13T21:10:42+5:302025-11-13T21:21:54+5:30
प्रत्यक्षदर्शींनी एक कंटेनर उतारावर भरधाव वेगात जात असताना अचानक त्याचे ब्रेक फेल झाले. त्यातच कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने या कंटेनरने समोर असलेल्या १० ते १५ वाहनांना जोरदार धडक दिली.

कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग
पुणे : बंगळुरू - पुणे महामार्गावर नवले पूल परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा शहर हादरले. दोन कंटेनर आणि एका कारच्या झालेल्या जबरदस्त अपघातात काही क्षणांतच ८ जण जळून खाक झाले. तर, तब्बल २० ते २५ जण जखमी झाले. गुरूवारी (दि. १३) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कात्रज बोगद्याकडून नवले पुलाकडे येणाऱ्या महामार्गावर हा अपघात झाला.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी एक कंटेनर उतारावर भरधाव वेगात जात असताना अचानक त्याचे ब्रेक फेल झाले. त्यातच कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने या कंटेनरने समोर असलेल्या १० ते १५ वाहनांना जोरदार धडक दिली. दरम्यान, प्रामुख्याने कंटेनरने एका ट्रॅव्हलर बसला धडक दिल्याने ट्रॅव्हलर पलटी झाला. त्यामध्ये १८ ते २० प्रवासी होते. धडकेनंतर कंटेनरच्या डिझेल टँकला आग लागली आणि काही क्षणांतच आगीचे लोट आकाशात झेपावले. या दरम्यान, सेल्फी पॉइंटजवळ एका टुरिस्ट कारला कंटेनरने पाठीमागून धडक दिली. कार पुढे उभ्या दुसऱ्या कंटेनरमध्ये कार अडकली आणि तिने पेट घेतल्याची माहिती ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
आगीमुळे अवघ्या काही क्षणातच कार आणि कंटेनरचा समोरील भाग जळून खाक झाला. कारमधील दोन पुरुष, दोन महिला आणि एका मुलीचा घटनास्थळीच होरपळून मृत्यू झाला. कंटेनर चालक आणि त्याचा क्लिनर यांचा देखील आगीत होरपळून मृत्यू झाला. पाच ते सात मिनिटात अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होताच, त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत वाहनांचे केवळ सांगाडेच उरले होते. रात्री आठ वाजेपर्यंत अग्निशमन दलाने तब्बल सात मृतदेह बाहेर काढले. तर जखमींना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर आहे. घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन पोलिसांनी लगेचच वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली. घटनास्थळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.
कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात...
या परिसरात याआधीही अनेक अपघात घडले असून स्थानिक नागरिकांचा संताप पुन्हा उफाळून आला आहे. ‘नवले पुलावर कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात,’ अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. आगीच्या आणि धुराच्या लोटांमुळे काही काळ परिसरात लांबचे दिसतही नव्हते. बचाव पथकांनी जीव धोक्यात घालून मदतकार्य केले. घटनास्थळी पसरलेला काळोख, वाहनांचे चेंदामेंदा झालेले अवशेष, आणि जखमींच्या नातेवाईकांचा हंबरडा हे दृश्य पाहून ह्रदय पिळवटून टाकणारे होते.
कारमधील सीएनजीचा स्फोट...?
प्राथमिक माहितीनुसार, कंटेनरने कारला पाठीमागून धडक दिल्यानंतर कारमधील सीएनजी सिलिंडरचा देखील स्फोट झाला. त्यामुळे आगीने जास्त भडका घेतला. क्षणार्धात झालेल्या घटनेमुळे कारमधील कोणालाही बाहेर पडता आले नाही, अशी माहिती देखील प्रत्यक्षदर्शींनी दिली.