'वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून जाहीर टीका करणे योग्य नाही', पाटील, मोहोळ यांची भाजप पदाधिकाऱ्यांना सूचना

By राजू हिंगे | Updated: April 9, 2025 20:58 IST2025-04-09T20:57:16+5:302025-04-09T20:58:38+5:30

कार्यकर्त्यांचे काही चुकले असेल, तर त्यांना पक्षाच्या बैठकीत समजावून सांगणे गरजेचे आहे’

Public criticism by senior office workers is not appropriate chandrakant Patil murlidhar Mohol advise BJP office workers | 'वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून जाहीर टीका करणे योग्य नाही', पाटील, मोहोळ यांची भाजप पदाधिकाऱ्यांना सूचना

'वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून जाहीर टीका करणे योग्य नाही', पाटील, मोहोळ यांची भाजप पदाधिकाऱ्यांना सूचना

पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी भाजप महिला आघाडीने डॉक्टर घैसास यांच्या रुग्णालयाची तोडफोड केली, या कृत्याचा भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी निषेध करत शहराध्यक्षांना पत्र लिहिले आहे. मात्र हे पत्र आपल्याला मिळाले नसल्याचे शहराध्यक्षांनी स्पष्ट केले, या प्रकरणावरून भाजपमध्ये पदाधिकाऱ्यांचाच एकमेकांशी मेळ नसल्याचे अधोरेखित झाले आहे. भाजपच्या महिला आघाडीने घेतलेली भूमिका भाजपच्याच खासदारांना न पटल्याने त्यांनी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. त्यानंतर पुन्हा शहराध्यक्ष धीरज घाटेंनीही महिला आघाडीकडून झालेली तोडफोड ही स्वाभाविक प्रतिक्रिया असल्याचे म्हणत खासदारांच्या भूमिकेला फारसे गांभीर्याने घेतलं नसल्याचे दिसून आले. 

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीकडून करण्यात आलेल्या आंदोलनावरून खासदार मेधा कुलकर्णी आणि भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पक्षशिस्तीवर ‘चिंतन’ करण्यात आले. पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी जाहीर वक्तव्य करू नये, अशा शब्दांत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पदाधिकाऱ्यांची कानउघडणी करतानाच आंदोलकांची पाठराखण केली.

भाजपच्या संघटनात्मक बैठकीला मोहोळ, पाटील, खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह पक्षाचे आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत भाजपच्या महिला आघाडीने केलेल्या आंदोलनावरून झालेल्या वादावर चर्चा करण्यात आली. ‘कोणतीही गंभीर घटना घडल्यानंतर त्यावर कार्यकर्त्यांकडून आंदोलन करणे, ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. मात्र, त्यावर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून जाहीर टीका करणे योग्य नाही. कार्यकर्त्यांचे काही चुकले असेल, तर त्यांना पक्षाच्या बैठकीत समजावून सांगणे गरजेचे आहे’, अशा शब्दांत पाटील आणि मोहोळ यांनी पदाधिकाऱ्यांना सुनावले.

Web Title: Public criticism by senior office workers is not appropriate chandrakant Patil murlidhar Mohol advise BJP office workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.