आरक्षणासाठी अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर धनगर समाज बांधवांचे ठिय्या आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 06:05 PM2023-11-19T18:05:23+5:302023-11-19T18:07:35+5:30

बारामती शहरातील सहयोग सोसायटी समोर भिगवण रस्त्यावर धनगर समाज बांधवांनी ठिय्या आंदोलन केले

Protest by Dhangar Samaj brothers in front of Ajit Pawar residence for reservation | आरक्षणासाठी अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर धनगर समाज बांधवांचे ठिय्या आंदोलन

आरक्षणासाठी अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर धनगर समाज बांधवांचे ठिय्या आंदोलन

बारामती: एस. टी आरक्षण अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. रविवारी(दि १९) उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या बारामती शहरातील सहयोग सोसायटी समोर भिगवण रस्त्यावर धनगर समाज बांधवांनी ठिय्या आंदोलन केले.

शहरातील प्रशासकीय भवन समोर चंद्रकांत वाघमोडे पाटील यांचे आरक्षणासाठी गेले ११ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. मात्र, अद्यापही राज्य सरकारमधील जबाबदार मंत्री आंदोलनाच्या ठिकाणी येत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. वाघमोडे यांच्या आंदोलनाला बळ देण्यासाठी आजपर्यंत ग्रामीण भागात रास्तारोको,कॅंडल मार्च,बारामती शहर कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.त्यापाठोपाठ रविवारी धनगर समाज बांधवांनी प्रत्येक आमदार खासदाराच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर धनगर समाजातील कार्यकर्ते आंदोलनासाठी एकत्रित आले. मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने सहयोग भवन सोसायटीच्या समोर आंदोलन करण्यास पोलिसांनी विरोध केला.

यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड अमोल सातकर म्हणाले, गेली दहा दिवसांपासून बारामती शहरात चंद्रकांत वाघमोडे पाटील हे धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषणास बसले आहेत. अन्नाचा कणही वाघमोडे यांनी घेतलेला नाही, तरीदेखील उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी फिरकले नाहीत हे दुर्दैवी आहे. राज्य सरकार धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. धनगर समाजाला एसटीचे आरक्षण तातडीने लागू करण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा सातकर यांनी यावेळी दिला. यावेळी भाजपचे अभिजीत देवकाते, वैभव सोलनकर, ॲड गोविंद देवकाते, अहिल्या क्रांती सेनेच्या अध्यक्षा कल्याणी वाघमोडे, जगदीश कोळेकर, महादेव कोकरे, ॲड दिलीप धायगुडे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

आंदोलकांनी बारामती भिगवण रोडवर सहयोग भवन समोर ठिय्या मांडत जोेरदार घोषणाबाजी केली. यावेळी बाहेर निघा, बाहेर निघा, अजित पवार बाहेर निघा!!, या लोकप्रतिनिधीचं करायचं काय?...,आरक्षण आमच्या हक्काचं! नाही कोणाच्या बापाचं!!, येळकोट, येळकोट, जय मल्हार!!अशा घोषणा देण्यात आल्या.

Web Title: Protest by Dhangar Samaj brothers in front of Ajit Pawar residence for reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.