शरद पवार गटाने दिले उंदीर पकडायचे पिंजरे भेट; यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील अस्वच्छतेच्या निषेधार्थ आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 16:29 IST2025-06-04T16:28:15+5:302025-06-04T16:29:18+5:30
गंभीर म्हणजे उंदराच्या हल्ल्यामुळे एका महिलेला झालेली इजा ही घटना अत्यंत लाजिरवाणी व धक्कादायक आहे

शरद पवार गटाने दिले उंदीर पकडायचे पिंजरे भेट; यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील अस्वच्छतेच्या निषेधार्थ आंदोलन
पुणे: कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उंदराचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील अस्वच्छतेचा तीव्र निषेध करून आंदोलन केले. यावेळी उंदीर पकडायचे पिंजरे भेट देण्यात आले आहेत. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात प्रयोग सुरू होण्याआधीही सगळीकडे उंदीर फिरत होते. महिला प्रेक्षकांच्या साडीत उंदीर शिरले होते. ही घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने स्वच्छतेच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
युवक अध्यक्ष किशोर कांबळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी रोहन पायगुडे, गिरीश गुरनानी, स्वप्नील खवले, अभिषेक लोहकरे, अमोघ ढमाले आदी उपस्थित होते. या नाट्यगृहात तत्काळ स्वच्छता मोहीम आणि फवारणी हाती घ्यावी. नागरी सुरक्षेची पूर्ण काळजी घ्यावी. नाट्यगृहाची दुरुस्ती व व्यवस्थापन सुधारण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
युवक काँग्रेसकडून तीव्र निषेध
पुणे शहराची ओळख म्हणजे येथे फुललेली समृद्ध नाट्यपरंपरा, सुसंस्कृत रसिक प्रेक्षक, आणि विविध कला सादर करण्यासाठीचे हे आदर्श व्यासपीठ आहे. मात्र काही दिवसांपूर्वी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील अस्वच्छता, आणि त्याहून गंभीर म्हणजे उंदराच्या हल्ल्यामुळे एका महिलेला झालेली इजा ही घटना अत्यंत लाजिरवाणी व धक्कादायक आहे. ही बाब केवळ स्वच्छतेच्या दृष्टीनेच नव्हे, तर पुण्याच्या सांस्कृतिक अस्मितेला आणि ‘स्वच्छ भारत – सुंदर पुणे’ मोहिमेला सुद्धा काळिमा फासणारी आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस - शरदचंद्र पवार पुणे शहर यांच्या वतीने आम्ही या दुरवस्थेचा तीव्र निषेध करतो