रामदास आठवले यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी केले रास्ता राेकाे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 16:14 IST2018-12-09T16:12:39+5:302018-12-09T16:14:57+5:30
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यावर शनिवारी अंबरनाथ येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील आंबेडकर पुतळा येथे रविवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

रामदास आठवले यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी केले रास्ता राेकाे
पुणे : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यावर शनिवारी अंबरनाथ येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील आंबेडकर पुतळा येथे रविवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे दीड तास आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून हल्लेखोरांवर कठोर कारवाईची तसेच या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष परशुराम वाडेकर, कामगार आघाडीचे महेश शिंदे, पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, शहर संपर्क प्रमुख अशोक शिरोळे, नगरसेविका सुनीता वाडेकर, हिमाली कांबळे, नीलेश आल्हाट, जगन्नाथ गायकवाड, रोहिदास गायकवाड, बसवराज गायकवाड, बाबुराव घाडगे, शैलेश चव्हाण, महिपाल वाघमारे, महिला अध्यक्ष शशिकला वाघमारे, महिला आघाडीच्या प्रियदर्शिनी निकाळजे, किरण भालेराव यांच्यासह सर्व मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.अंबरनाथ येथे आठवले यांच्या बाबतीत घडलेला प्रकार निंदनीय असल्याचे मत व्यक्त करत या घटनेचा पक्षाच्या वतीने यावेळी जाहीर निषेध करण्यात आला.
डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, रामदास आठवले हे सामान्य जनतेच्या अडचणी सोडवणारे नेते असून वाढत्या लोकप्रियतेमुळेच त्यांच्यावर हल्ला झाला आहे. संबंधित हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी. तसेच आठवले यांना पुरविण्यात येत असलेल्या सुरक्षेत अधिक वाढ करावी.आठवले यांच्या वरील हल्ल्याचा निषेध करताना कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये. सर्वांनी शांततेच्या मार्गाने निषेध व्यक्त करावा.
बाळासाहेब जानराव म्हणाले, रामदास आठवले यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्याने अनेकांच्या मनात त्यांच्याबद्दल आसुया आहे. याच राजकीय भावनेतून हा हल्ला झाला असावा.मात्र,विचारांचा सामना अशा पद्धतीने करणा-या प्रवृत्तींना ठेचून काढले पाहिजे.
परशुराम वाडेकर म्हणाले, रामदास आठवले दलित, शोषित, आदिवासी जनतेच्या प्रश्नांवर लढणारे नेते असून त्यांच्यावर झालेला हल्ला हा प्रसिद्धी मिळवण्याच्या उद्देशाने झाला आहे. त्यांना झेड सुरक्षा असताना स्थानिक पोलीस काय करत होते, याची मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी.
या प्रसंगी महेश शिंदे, शशिकला वाघमारे, हिमाली कांबळे, अशोक कांबळे, रोहिदास गायकवाड, शैलेंश चव्हाण, जगन्नाथ गायकवाड, महिपाल वाघमारे यांनीही रामदास आठवले यांच्या वरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आंदोलन समाप्त झाले.