Pune Crime: मार्केट यार्ड भागात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; तरुणींना ताब्यात, एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 12:54 IST2025-09-25T12:53:12+5:302025-09-25T12:54:37+5:30
Pune Crime News: मसाज सेंटरमधील तरुणींना पैशांचे आमिष दाखवून एका महिला वेश्याव्यवसायास प्रवृत्त करत असल्याची माहिती स्वारगेट पोलिसांना मिळाली

Pune Crime: मार्केट यार्ड भागात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; तरुणींना ताब्यात, एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : मार्केट यार्ड भागात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी मसाज पार्लरमधून तरुणींना ताब्यात घेतले. तरुणींना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वैशाली रंगनाथ विसपुते (३१, सध्या रा. टिळेकरनगर, कोंढवा, मूळ रा. तळणी, ता. सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर) असे गुन्हा दाखल केलेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत पोलिस हवालदार अश्रुबा मोराळे यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मार्केट यार्डातील एका सोसायटीत आरोपी वैशाली विसपुते ही वसुंधरा आयुर्वेदिक मसाज सेंटर चालवत होती. मसाज सेंटरच्या नावाखाली तेथे वेश्याव्यवसाय सुरू होता. मसाज सेंटरमधील तरुणींना पैशांचे आमिष दाखवून विसपुते त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त करत असल्याची माहिती स्वारगेट पोलिसांना मिळाली. मंगळवारी (दि. २३) दुपारी साडेचारच्या सुमारास पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून मसाज सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खातरजमा केली. त्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला. या कारवाईत मसाज पार्लरमधील तरुणींना ताब्यात घेण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत निकम तपास करत आहेत.
ही कारवाई अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पोलिस निरीक्षक आशालता खापरे, सहायक फौजदार छाया जाधव, सहायक फौजदार अजय राणे, पोलिस अंमलदार तुषार भिवरकर, इम्रान खान नदाफ, अमेय रसाळ व किशोर भुजबळ, स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत निकम व पोलिस अंमलदार यांनी केली आहे.