बाणेरमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; ७ महिलांची सुटका, मॅनेजर, मालकासह चौघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 18:24 IST2025-09-13T18:24:29+5:302025-09-13T18:24:44+5:30
आरोपी त्या महिलांंना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते. त्यातून मिळालेल्या पैशातून स्वतःची उपजीविका भागवत होते

बाणेरमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; ७ महिलांची सुटका, मॅनेजर, मालकासह चौघांवर गुन्हा
पुणे : बाणेर येथील पॅनकार्ड क्लबरोड परिसरातील स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर बाणेरपोलिसांनी कारवाई केली. यावेळी तेथून सात पीडितांची सुटका करण्यात आली आहे. फॉर्च्यून स्पा सेंटरमध्ये हा देह विक्रीचा हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी, महिलापोलिस उपनिरीक्षक शैला पाथरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बाणेर पोलिस ठाण्यात स्पा मॅनेजर सुशील त्रिलोक ठाकूर (२६, रा. बाणेर, मुळ. हिमाचल प्रदेश), दिपक बिजेंद्र सिंह (३१,रा.दिल्ली), स्पा मालक ऋषभ राजेंद्र पाटील (३०, रा. जळगाव) आणि जागा मालक जयेश सुनील अतमानी (२९, रा. पिंपळे सौदागर) या चार जणांविरोधात अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पॅनकार्ड क्लबरोड बाणेर येथील एका खासगी बँकेच्या वर असलेल्या ओंकार पॅराडाईज या इमारतीत फॉर्च्यून स्पा सेंटरमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती बाणेर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता, तेथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले. त्यानुसार बाणेर पोलिसांनी शुक्रवारी (दि. १२) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास छापा टाकून, पाच पीडित महिलांची सुटका केली. आरोपी स्पा मॅनेजर ठाकूर आणि सिंह हे दोघे त्या महिलांंना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते. त्यातून मिळालेल्या पैशातून स्वतःची उपजीविका भागवत होते. तर जागा मालक जयेश अतमानी याने त्याच्या मालकीची जागा आरोपींना स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविण्यास खुली करून दिली. तसेच ही जागा भाड्याने देताना, निर्धारित नियमानुसार भाडेकरूची माहिती जवळच्या पोलिस ठाण्यात दिली नाही. त्यामुळे त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे निरीक्षक अलका सरग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.