मिळकतींचे मीटर बंद, तरी पाण्याची बिले दारी! पुणे महापालिकेचा अजबगजब कारभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 11:44 IST2025-03-19T11:44:07+5:302025-03-19T11:44:39+5:30
महापालिकेने प्रत्यक्ष जागेवर जाऊन संबंधित व्यक्ती त्या ठिकाणी राहत आहे का? तसेच त्या ठिकाणचा पाणीपुरवठा खरेच मीटरने सुरू आहे का, याची तपासणी करावी

मिळकतींचे मीटर बंद, तरी पाण्याची बिले दारी! पुणे महापालिकेचा अजबगजब कारभार
पुणे : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहरात २४ वर्षांपूर्वी पाण्याचे मीटर बसविले होते. त्यानंतर, महापालिकेने निवासी मिळकतींचे मीटर बंद केले असले तरी अद्यापही नागरिकांना पाण्याची बिले येत आहेत. मात्र, ज्या पत्त्यावर ही बिले पाठविली जात आहेत, त्या ठिकाणी कोणीही राहत नसल्याने ही बिले भरली जात नाहीत. अनेकदा अशी कितीतरी बिले पडून राहतात. त्यामुळे ही थकबाकी दुरुस्त करण्यासाठी महापालिकेने प्रत्यक्ष जागेवर जाऊन संबंधित व्यक्ती त्या ठिकाणी राहत आहे का ? तसेच त्या ठिकाणचा पाणीपुरवठा खरेच मीटरने सुरू आहे का, याची तपासणी करावी, अशी मागणी नागरी हक्क संस्थेने महापालिकेकडे केली आहे.
अनेक जुन्या वाड्यांचा पुनर्विकास झालेला आहे; तसेच घरे, वाड्यातील भाडेकरू, घरमालक, दुकानदार हे जागेवर आहेत की नाहीत, याची तपासणी करणे जरुरीचे आहे. अनेक भाडेकरू न्यायालयाच्या निकालानंतर अथवा वाडा पडला म्हणून घर सोडून गेलेले आहेत. असे असताना संबंधिताच्या नावाने पाण्याची बिले येत आहेत. मात्र, प्रत्यक्षात तिथे कोणीच राहत नसल्याने ही बिले भरली जात नाहीत. त्यामुळे थकबाकी वाढतच आहे. त्यामुळे महापालिकेने प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्वेक्षण केल्यास थकबाकीदार खरंच राहतात का ? मीटरने पाणी दिले जात आहे का? संबंधित मिळकत अस्तित्वात आहे का? तसेच मीटर आणि नळजोड असल्यास संबंधित राहणारी व्यक्ती त्याचे बिल भरत आहे का ? याची तपासणी केल्यास ही थकबाकी निकाली काढणे शक्य होणार आहे. त्यामुळे तातडीने याबाबत निर्णय घेण्याची मागणी नागरी हक्क संस्थेचे सुहास कुलकर्णी यांनी केली आहे.