मृत महिलेला भासवले कोरोनाग्रस्त डॉक्टर; सोशल मीडियावर फेक न्यूजचा सुळसुळाट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 10:11 PM2020-04-24T22:11:17+5:302020-04-24T22:39:11+5:30

शुक्रवारी एका महिलेचा फोटो कोरोनामुळे मृत झालेल्या डॉक्टर म्हणून सोशल मीडियावर व्हायरल झाला...

The proliferation of fake news on social media; The dead woman was corona infected | मृत महिलेला भासवले कोरोनाग्रस्त डॉक्टर; सोशल मीडियावर फेक न्यूजचा सुळसुळाट

मृत महिलेला भासवले कोरोनाग्रस्त डॉक्टर; सोशल मीडियावर फेक न्यूजचा सुळसुळाट

googlenewsNext
ठळक मुद्देघरच्यांसह रुग्णालय व्यवस्थापनालाही त्रास ; महिलेचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह या महिलेच्या घरच्यांनीही सोशल मीडियावर याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली

पुणे : सोशल मीडियाच्या जमान्यात कोणतीही खातरजमा न करता पोस्ट व्हायरल होणं नवीन नाही. त्यामुळे अनेकांना मनस्तापही झालेला बघायला मिळतो. असाच एक प्रकार पुण्यातही घडला असून शुक्रवारी एका महिलेचा फोटो कोरोनामुळे मृत झालेल्या डॉक्टर म्हणून सोशल मीडियावर व्हायरल झाला. काही तासात ती पोस्ट अनेक फेसबुक पेजवर आणि अनेकांच्या व्हाट्स अपच्या स्टेट्सवरही दिसत होती. मात्र त्याचे सत्य समोर आल्यावर सोशल मीडियाच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. 
   संबंधित मृत महिलेचा फोटो सोशल मीडियावर कोरोना बाधित म्हणून वापरण्यात आला. इतकेच नव्हे तर पुणे महापालिकेच्या नायडू रुग्णालयात रुग्णसेवा बजावत असताना कोरोनाची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यात म्हटले होते. प्रत्यक्ष माहिती घेतल्यावर नायडू प्रशासनाने असे काहीही घडले नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर जहांगीर रुग्णालयाने या महिलेचे निधन त्यांच्या रुग्णालयात २२ एप्रिल रोजी झाले असून त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचे सांगितले. मात्र त्या डॉक्टर होत्या की नाही याबाबत रुग्णालय प्रशासनाने कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. या महिलेच्या घरच्यांनीही सोशल मीडियावर याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून त्यामुळे मनस्ताप झाल्याचेही म्हटले आहे. हा प्रकार ज्यांनी केला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

-------------
संबंधित महिलेचे निधन आमच्या रुग्णालयात झाले असले तरी त्यांना कोरोनाची लागण नव्हती. त्यांचे रिपोर्ट एनआयव्हीमध्ये तपासणीस पाठवले होते. ते निगेटिव्ह आले आहेत. डॉ सत्यजित सिंग गिल, वैद्यकीय संचालक, जहांगीर रुग्णालय 

फॉरवर्ड मेसेज डिलिट आणि माफीही मागितली 
संबंधित महिलेचा फोटो असलेली पोस्ट अनेकांनी फॉरवर्ड केली होती. सत्य समजल्यावर मात्र त्यांनी तातडीने ती पोस्ट डिलीट  केली. इतकंच नाही तर काहींनी माफीही मागितली. त्यामुळे खात्री न करता फॉरवर्ड करणारे तोंडावर पडलेले बघायला मिळाले. 

Web Title: The proliferation of fake news on social media; The dead woman was corona infected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.