Manache Shlok: दिग्दर्शकावर येणारा दबाव म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी; मनाचे श्लोक शीर्षकावर आक्षेप चुकीचा - राष्ट्रवादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 10:16 IST2025-10-15T10:15:15+5:302025-10-15T10:16:47+5:30
धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नसून चित्रपटाच्या नावात साम्य आहे, शिवाय कलावंत, दिग्दर्शक यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे

Manache Shlok: दिग्दर्शकावर येणारा दबाव म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी; मनाचे श्लोक शीर्षकावर आक्षेप चुकीचा - राष्ट्रवादी
पुणे : ‘मनाचे श्लोक’ या मराठी चित्रपटाला अनेक हिंदू संघटनांनी विरोध केला आहे. या विरोधी संघटनांनी या चित्रपटाच्या शीर्षकाचा धार्मिक ग्रंथाशी संबंध असल्याचे कारण दर्शवून, चित्रपट बंद करावा किंवा नाव बदलावे, अशी मागणी केली आहे. परंतु, चित्रपट हा कलाकृतीचे माध्यम आहे, त्यामध्ये धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नसून नावात साम्य आहे, शिवाय कलावंत, दिग्दर्शक यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे, त्यांच्यावर येणारा दबाव म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे, त्यामुळे त्यांना संरक्षण द्या, अशी मागणी राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केली.
याबाबतचे निवेदन त्यांनी प्रशासनाला दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, भारतीय चित्रपटसृष्टीत अशा अनेक उदाहरणांचा भरणा आहे. जिथे चित्रपटाचे नाव धार्मिक असले, तरी विषय पूर्णपणे वेगळा आहे. उदाहरणार्थ मराठीत देऊळ, बाळकडू, विठ्ठल, हर हर महादेव, तुकाराम यांसारखे चित्रपट हे समाजातील वास्तव, मानवी मूल्ये, इतिहास किंवा तत्त्वज्ञान मांडतात. पण, धार्मिक प्रचारक चित्रपट नाहीत. तसंच हिंदीमध्ये ओएमजी, पीके, सत्यम शिवम सुंदरम, राम तेरी गंगा मैली यांसारख्या चित्रपटांनी धर्म, समाज आणि श्रद्धेवर विचारप्रवर्तक संवाद साधला आहे.
‘मनाचे श्लोक’ हाही तसाच एक चित्रपट आहे, जो मानवी मन, विचार, नैतिक संघर्ष आणि समाजातील वास्तव यावर प्रकाश टाकतो. धार्मिक नाव असणं म्हणजे धार्मिक विषय असणं नव्हे. शीर्षक हे एक तत्त्वज्ञानात्मक रूपक आहे आणि कलात्मक अभिव्यक्ती म्हणून त्याचा आदर केला जाणं आवश्यक आहे.
कलाकार आणि निर्मात्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे. समाजात मतभेद असू शकतात, पण तो संवाद संविधान आणि संस्कृतीच्या मर्यादेत, शांततेने आणि विवेकाने व्हावा. प्रत्येक चित्रपटाला चर्चेची, नव्या विचारांची आणि स्वीकृतीची संधी मिळाली पाहिजे.- बाबासाहेब पाटील : प्रदेशाध्यक्ष- राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग