dussehra 2023: जेजुरीत मर्दानी दसऱ्याची तयारी, खंडोबा मंदिर भाविकांसाठी खुले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 01:36 PM2023-10-23T13:36:51+5:302023-10-23T13:37:43+5:30

मंदिरातील गाभाऱ्यातील कामे उरकल्याने भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर आजपासून खुले केले जाणार असल्याचे मार्तंड देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे यांनी सांगितले....

Preparations for Mardani Dussehra in Jejuri, Khandoba temple open for devotees | dussehra 2023: जेजुरीत मर्दानी दसऱ्याची तयारी, खंडोबा मंदिर भाविकांसाठी खुले

dussehra 2023: जेजुरीत मर्दानी दसऱ्याची तयारी, खंडोबा मंदिर भाविकांसाठी खुले

जेजुरी (पुणे) :जेजुरीत मर्दानी दसरा उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. जेजुरी विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामामुळे जेजुरीचे खंडोबा मंदिर भाविकांसाठी २९ ऑगस्टपासून बंद होते. मंदिरातील गाभाऱ्यातील कामे उरकल्याने भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर आजपासून खुले केले जाणार असल्याचे मार्तंड देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे यांनी सांगितले.

जेजुरीचे मंदिर बंद असल्याने भाविकांची गैरसोय होत होती. कुलधर्म कुलाचाराचे विधी थांबले होते. उत्सवाचे दिवसही आता सुरू झाले आहेत. भाविकांना सांभाळत उर्वरित कामे चालू राहतील. त्यामुळे आजपासून मंदिर भाविकांसाठी खुले केले जात असल्याचे श्री. खोमणे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी विश्वस्त पांडुरंग थोरवे, डॉ. राजेंद्र खेडेकर, अनिल सौदडे, मंगेश घोणे, अॅड. विश्वासराव पानसे आदी उपस्थित होते. दसरा उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी, रस्ता दुरुस्ती आदी नियोजन करण्यात आले आहे. पालखी देव भेट होते. त्या रमना परिसरापर्यंत विजेचे खांब लावण्यात आले आहेत. तलवार स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून यावेळी बक्षिसांची रक्कम वाढविण्यात आली आहे, अशी माहिती विश्वस्तांनी दिली. तलवार स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना निमंत्रित करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दसऱ्याला सहा वाजता पालखीचे प्रस्थान

दसरा उत्सवातील रमना परिसरातील देवभेट सोहळा मध्यरात्री दीड ते तीन वाजण्याच्या सुमारास होईल. त्यासाठी जेजुरी गडावरून सहा वाजता पालखीचे प्रस्थान होईल असे राजेंद्र पेशवे यांनी जाहीर केले. दसऱ्याच्या नियोजनासाठी ग्रामस्थ मंडळाची बैठक छत्री मंदिरावर आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, शशिकांत सेवेकरी, छबन कुदळे, कृष्णा कुदळे, गणेश आगलावे, जयदीप बारभाई, हेमंत सोनवणे, सुधीर गोडसे, मंगेश घोणे, राजेंद्र खेडेकर, ओंकार झगडे, अनिल झगडे, रामदास माळवदकर, संजय खोमणे, बंटी खान, किरण राऊत आदी प्रमुख मानकरी व पदाधिकारी उपस्थित होते.

खंडोबाचे वर्षभरातील वेगवेगळे पारंपरिक पद्धतीने चालत आलेले मान हा ग्रामस्थांचा विषय आहे. विश्वस्त मंडळाने याबाबत काही ठराव करू नये असे यावेळी ग्रामस्थांच्या सभेत सांगण्यात आले. दसरा उत्सवातील पालखी सोहळ्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

Web Title: Preparations for Mardani Dussehra in Jejuri, Khandoba temple open for devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.